प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           

संहितोपनिषद्.– संहितोपनिषद्ब्राह्मणांत सामगायन कसें करावे याविषयी उपदेश आलेला आहे.  संहितोपनिषद् हें सामवेदाचें ७ वे ब्राह्मण असून तें इतर सामवेदीय ब्राह्मण ग्रंथाप्रमाणे बऱ्याचशा अलीकडील काळांतले आहे.  या ब्राह्मणाची भाषा जरी बऱ्याच अंशी इतर ब्राह्मणांच्या भाषेशीं जुळती आहे तथापि आर्षरुपांचा त्यातील अभाव आणि आरण्यगान व ग्रामगेयगान यांचा उल्लेख ह्या गोष्टीवरुन हे ब्राह्मण अगदीं अलीकडेच तयार झालें असावें या विधानास पुष्टि येते.  कारण, ग्रामगेयगान हें सामवेदाच्या वाङमयापैकी अगदी अर्वाचीन आहे.  हें ब्राह्मण म्हणजे जुना गद्यभाग व पद्यें यांचा एक संग्रहच केलेला दिसतो.  या ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायांत विद्यादेवीने केलेला उपदेश व त्यासंबंधी आख्यायिका असून पुढें विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुंना कशा प्रकारें मान द्यावा याविषयीचे विवेचन आले आहे.  यास्काच्या निरुक्तांत व दुसऱ्या कित्येक स्मृतीतहि अशा प्रकारचे वर्णन आढळतें.  तुलनात्मक विचाराने संहितोपनिषद्ब्राह्मण हे निरुक्त्‍ व कांही स्मृती यांच्या दरम्यान बनले असावे असें अनुमान होते.  भारतीय शास्त्रें ही सामान्यत: ब्राह्मण ग्रंथातून विकासलेली दिसतात आणि या सिध्दंताप्रमाणे सामवेदब्राह्मणग्रंथांमध्येच भारतीय संगीतशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास होत असल्याचें दिसून येते.  या ब्राह्मणाच्या पहिल्या अध्यायांत सामगायनाच्या विविध पद्धतींविषयीं विवेचन आलें आहे.  त्यावरुन असें दिसते कीं, सामगायक यांनी आपल्या स्वभावसिद्ध अशा स्वरांतच सामगायन करावे असा नियम झाला होता.  गाणे अनेक स्वरांत गाणें हें निराळें, आणि आवाजाचें सातांत वर्गीकरण करणें हे निराळें.

संहितोपनिषद् ब्राह्मण ग्रंथाचा दुसरा व तिसरा हे अध्याय बऱ्याच महत्वाचे आहेत.  कारण, या अध्यायात सामें व त्यांच्या ॠचा यांच्या परस्परसंबंधाविषयी अगदी प्राथमिक तऱ्हेचे विवेचन आले आहे.  या विवेचनावरुन असें दिसून येतें की तत्कालीन सामगायकांस उदात्त, अनुदात्त इत्यादि वैदिक स्वर, व उच्च, नीच वगैरे सामगानांतील स्वर यांचा एकमेकांशी कांही संबंध आहे अशी पुसट पुसट कल्पना असावी.  या ब्राह्मणग्रंथात उल्लेखिलेली स्वरमालिका पूर्ण आहे.  सात स्वरांनी युक्त इतकें गाणें एकदम वाढलें नाही अशी प्राचीनांची कल्पना होती.  नारदी शिक्षेवरुन असें आढळते कीं, पहिले चार स्वर विष्णु, सोम, ब्रह्मा व अग्नि यांनी उत्पन्न केले.  सप्तम स्वर नारदांनी स्वत: उत्पन्न केला व तुंबरु याने पांचवा व सहावा स्वर घालून एकंदर स्वरमालिका तयार केली.