प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

संस्कृतछंद:शास्त्राचा प्रसार व प्रसाराबरोबर विकास.- संस्कृत वृत्तापध्दतीचा प्रसार पुष्कळ झाला आहे. जेथें जेथें संस्कृतोद्भव संस्कृति पसरली तेथें तेथें आपल्या इतर शास्त्रां- बरोबर आपलें छंद:शास्त्रहि पसरलें. तेलगू, कानडी वगैरे ग्रंथकारांनीं संस्कृत वृत्तें घेतलीं पण त्याबरोबर आपलीं निराळया परंपरेंतून आलेलीं वृत्तेंहि कायमच ठेविलीं. ही क्रिया द्राविडी हिंदुस्थानांत जशी झाली तशीच जावा वगैरेकडेहि झाली त्यांनीं शार्दूलविक्रीडित, स्त्रग्धरा, पृथ्वी, सुवदना, प्रहर्षिणी, स्वागता, इत्यादि वृत्तें घेतलीं पण शिवाय कृतिसूर्त, धृतिसूर्त, अभिकृतिसूत, आकृतिसूर्त इत्यादि वृत्तें नवीन वाप- रलीं हें पहिल्या विभागांतील यावद्वीप संकृतीवरील ( पृ. २१९ ) विवेचनावरून कळून येईल.

द्राविडी लोकांनीं संस्कृत छंद:शास्त्र घेतलें तरी तामिळ  लोकांनीं आपलें निराळें छंद:शास्त्र कायम ठेवलें. हिंदुस्थानांत संस्कृतोद्भव भाषा जेथें जेथें वापरल्या जातात तेथें देखील नवीन छंदोरचना होण्याची क्रिया चालू होतीच. चौपाई, दोहोरा इत्यादि वृत्तें हिंदीमध्यें वापरलीं जातातच. तीं प्राकृत पिंगलांत दृग्गोचर होतात, पण प्राकृत वृत्तें तयार होतांना नवीन कल्पना, जुन्या वृत्ताचे सहेतुक किंवा प्रामादिक रूपांतर इत्यादि क्रिया झालेल्या दिसतातच. याशिवाय प्रांताप्रातांतच देवघेवहि असावी. साकी, दिंडी यांसारखीं वृत्तें मराठींत व गुजराथींत वापरलीं जातात. पुष्कळदां एक भाषा बोलणारा दुसऱ्या भाषेंत कवन करी. या क्रियेमुळें एकदेशीय छंद:शास्त्राच्या सार्वत्रिकतेस जागा असे. मराठीचे इतर भाषांतील छंद:शास्त्रावर व इतर भाषांचे मराठी छंदोज्ञानावर परिणाम पुष्कळ झाले असावेत. लावणी आपण मराठीच समजतों पण कांहीं शोधक असें म्हणतात कीं ती बाहेरची आहे.

 वृत्तें व त्यांचे स्पष्टीकरण करणारें कोष्टक

वृत्तरत्नाकरांत जरी पिंगलाच्या छंद:सूत्रापेक्षा एकंदरीत जास्त वृत्तें आहेत तरी पुढे दिलेली पिंगलांत सापडणारी वृत्ते वृत्तरत्नाकरांत आढळत नाहीत.

मात्रा वृत्ते.– अपरांतिका, आपातलतिका, उदीच्यवृत्ति, उपचित्रा, चपला, चारुहासिनी, चित्रा, चूलिका, जघनचपला, ज्योति, पथ्या, पादाकुलक, प्रवृत्तक, प्राच्यवृत्ति, महाचपला, मुखचपला, वानवासिका, विपुला, विश्लोक, सौम्या.

अक्षर गणवृत्ते.– अमृतधारा, आपीड, उद्धर्पिणी, उपस्थितप्रचुपितम्, खंजामहती, जगती, भद्रकम्, मंजरी, ललितम्, लवली, वर्धमानम्, विपुला, वसवस्त्रिका, शिखा, श्येनी, शिखाविपर्यस्ता, सौरभकम्.