प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
सहा स्वरांचे सामगायन.– सामगायन हे प्रथम सहा स्वरात्मक असलें पाहिजे हें त्यांच्या प्रथम स्वराच्या कल्पनेवरुनच व्यक्त होते.  द्वितीय स्थानी जो स्वर आहे त्यास प्रथम हे नांव आहे, क्रुष्ट स्वर नंतर ओळखला गेला असावा.

“तद्योसौ व्रुच्ष्टतम इव साम्र: स्वरस्तं देवा उपजीवन्ति योऽवरेषा प्रथमस्तं मनुष्या यो द्वितीयस्तं गंधर्वाप्सरसो यस्तृतीयस्तं पशवो यश्चतुर्थस्तं पितरो ये चांडेषु शेरते य:पंचमस्तमसुररक्षांसि योऽन्त्यस्तभोषधयो वनस्पतयायेच्चान्यज्जगत्” [ सानविधान ब्राह्मण .१, ३ ].

अर्थ:- सामामध्ये इतर सहा स्वरांहून उंच असा जो स्वर किंवा सूर असतो तो `क्रुष्ट’ होय.  या स्वरांच्या ठिकाणी देव तृत्प होत असतात.  शिल्लक राहिलेल्या सहा स्वरांमध्ये जो ‘पहिला’ किंवा मुख्य स्वर असतो त्याच्या ठिकाणी मनुष्ये संतुष्ट होतात.  दुसऱ्यापासून पांचव्या स्वरापर्यंतच्या स्वरांच्या ठिकाणी अनुक्रमें गंधर्वाप्सरा, पशु, पितर व ब्रह्माडांत राहणारे सर्व प्राणी, असुर व राक्षस हे तृत्प होत असून शेवटचा जो स्वर त्याच्या ठिकाणी औषधी, वनस्पती व सारे जग तृप्त होते.