प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
विशिष्ट वृत्ताविषयक उल्लेख.- प्रत्येक वृत्तावर असलेल्या विधिविषयक ग्रंथांतील ठिकठिकाणीं सांपडणाऱ्या आधारांचें आतां पौराणिक कथांकडे व रहस्यार्थांकडे लक्ष देऊन वर्गीकरण करूं.
गा य त्री.- सर्व छंद पूर्वी चारच अक्षरांचे होते, असें ऐतरेय ब्राह्मणांत म्हटलें आहे [ छंदांसि वै तत्सोमं राजानं अच्छाचरंस्तानिहतर्हि चतुरक्षराणि चतुरक्षराण्येव च्छंदांसि...( ३. २५ ) ]. त्रिष्टुम व जगती हे दोन छंद गायत्रीशीं भांडले व तुझयाजवळ जास्त असणारीं चार अक्षरें आम्हांस दे असें म्हणाले. नंतर दोघेजण देवांच्याकडे भांडण मिटविण्याकरितां गेले. परंतु अखेर देवांनीं गायत्रीसारखाच निकाल दिला. अशी कथा ऐतरेय ब्राह्मणांत ३. २८ येथें आहे. त्याचप्रमाणें आठ अक्षरांची गायत्री, ११ अक्षरांचा त्रिष्टुभ् व १२ अक्षरांची जगती कशी झाली याविषयीं कथा (ततोवाअष्टाक्षरागायत्र्यभवदेकादशाक्षरत्रिष्टुब्द्वादशाक्षराजगती) हि ३.२८ येथें आहे. गायत्रीच्या प्रत्येक पादामध्यें आठ अक्षरें असतात व सर्व पाद मिळून चोवीस अक्षरें असतात असें पुष्कळ ठिकाणीं म्हटलें आहे; व जेथें जेथें म्हणून आठ वस्तूंचा समुच्चय किंवा २४ वस्तूंचा समुच्चय वादाचा विषय आहे तेथें तेथें गायत्रीचा उल्लेख येतो. आठ अक्षरें असून नववें ' प्रणव ' हें कधीं कधीं येतें. म्हणून गायत्रीला ' नवाक्षरा ' असेंहि म्हणतात. ह्या छंदाचा अग्नि ह्या देवतेशीं निकट संबंध आहे; व त्या देवतेशीं ह्याचें तादाम्य झालें आहे. अग्नीचा छंद असा ह्या छंदाचा निर्देश केला जातो. त्याचप्रमाणें गायत्री ह्या देवतेचें अग्नि ह्या देवतेशीं ऐक्य झाल्याचाहि निर्देश आहे. सदरहूप्रमाणें अग्नीचें आठ वसूंशीं आणि गायत्रीशीं ऐक्य दिसून येतें. अग्निदेवतेचीं सूक्तें बहुतकरून गायत्री छंदांतच रचिलीं आहेत. कारण, गायत्री छंदांतच तीन भुवनांच्यापैकीं एक ' पृथिवी ' हें अग्नीचें स्थान सांपडतें आणि तीन सवनांच्यापैकीं सकाळचा यज्ञ किंवा प्रात:सवन हें गायत्री छंदांतल्या अग्निसूक्तांत सांपडतें. जें त्याचें आदि आहे, ज्याच्या योगानें त्याला वर्चस्व आलें आहे तें सर्व गायत्री छंदांत आहे.
उ ष्णि ह्.- उष्णि या छंदासच ' चतुरुत्ताराणि ' पध्दती प्रमाणें उष्णिह् असें म्हणतात. ह्या शब्दाचा अर्थ ' प्रसव ' म्हणजे दुसऱ्या वस्तूपासून झालेली वाढ हा होय. हा अर्थ ह्या वृत्ताच्या आकारांशीं जुळतो. त्यामध्यें आठ, आठ, बारा अशीं अक्षरें असतात.
क कु भ् छं द.- हा उष्णिह् छंदाचाच एक प्रकार आहे. ह्या दोनहि स्वरूपांविषयीं एक कथा ' ब्राह्मणात ' आहे.
प र उ ष्णि ह्.- हा देखील उष्णिहचाच एक विशिष्ट भेद आहे.
अ नु ष्टु भ्.- हा तिसरा छंद होय. हा फारच महत्वाचा आहे. ऋग्वेद १०. १२४, ९ येथें असें म्हटलें आहे कीं ' ऋषींनां आपल्या अध्यात्म दृष्टीनें असें दिसलें कीं जोराच्या बोलवण्यानें इंद्र लागताच येतो.
एका ब्राह्मणउताऱ्यामध्यें या छंदाचें विवरण आहे असें यास्काचार्यांनीं लिहिलें आहे. अनुष्टुभ् आपल्या चवथ्या पादामुळें मागें राहतो व तीन पादांच्या गायत्रीमागें लंगडत लंगडत येतो असें त्यांत वर्णन आहे.
गायत्री प्रजापतीच्या पायापासून उत्पन्न झाली वगैरे अर्थाविषयीं व उगमाविषयीं विविध खुलासे सांपडतात.
पि पी लि का म ध्या.- ह्या नांवाचा अनुष्टुभाचा एक विशिष्ट भेद आहे. ह्या छंदामध्यें तीन पाद असून त्यांपैकीं दोन प्रत्येकीं बारा अक्षरांचे असतात व तिसरा आठ अक्षरांचा असतो. हें नांव मुंगीच्या आकारावरून आलें हें स्पष्ट दिसतें. कारण मुंगीच्या शरीराचा मध्यभाग बारीक असतो.
बृ ह ती.- वैदिकवाडमयांत चवथा महत्वाचा छंद म्हणजे ' बृहती ' हा होय. हा ३६ अक्षरांचा असतो. ' बृहती ' म्हणजे ' मोठी ' हें नांव बहुतकरून १२ अक्षरांचा मोठा पाद तींत असतो ह्यावरून पडलें असावें. ह्या छंदाविषयीं कांहीं कथा ' ब्राह्मण ' ग्रंथांतून सांपडतात. ह्या छंदाला सर्व छंदांचा तारक व दीप्ति असें म्हटलें आहे. त्याचप्रमाणें ह्या छंदाला स्वयंप्रकाशित असें म्हटलें आहे. हा छंद सर्व छंदांमध्यें येतो व सर्व छंद ह्याच्या ठिकाणीं एकत्र होतात ह्या गोष्टीवरून बृहतीला वरील विशेषण मिळालें असावें. म्हणूनच जेथें विधिविषयक ग्रंथांत अमुक अनुष्टुभ् किंवा श्लोक ह्या ग्रंथांत आहेत अशी संख्या दाखवावयाची असते तेथें बृहती हें मूलपरिणाम धरलें आहे.
प्रगाथघटनेमध्यें बृहतीचा कसा उपयोग होतो हें मागें दिल आहे. बृहती ३६ अक्षरांची असते ही गोष्ट पुष्कळ ठिकाणीं दिलेली आहे. आणि ह्या छंदनामाचा ३६ वस्तूंच्या समुच्चयाच्या प्रश्नोत्तारांतील स्पष्टीकरणांत व ३६ वस्तूंचें माहात्म्य दर्शविण्याकरितां उपयोग केला आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे ' बृहती ' हा शब्द ३६ संख्येचा द्योतक झाला. त्याचप्रमाणें 'अयन' आणि ' बृहती ' हीं एकच आहेत असें म्हटलें आहे. कारण १२ पौर्णिमा, १२ अष्टका व १२ अमावास्या त्यात येतात.
'सतोबृहती' असा 'बृहती' या छंदाचा दुसरा एक भेद आहे. ह्या छंदामध्यें बृहतीप्रमाणें एका श्लोकार्धांतच १२ अक्षरें असतात असें नव्हे तर दोन्हीहि अर्धांमध्यें १२ अक्षरें असतात.
पंक्ति.- पांचव्या छंदाचें नांव ' पंक्ति ' असें आहे. हा ४० अक्षरांचा असतो. तो आपल्या ' पाचपणा ' ह्या नांवाप्रमाणें पांच पादांचा असून प्रत्येक पाद आठ अक्षरांचा असतो. ब्राह्मण ग्रंथामध्यें 'पञचपाद' अशी प्रत्यक्ष संज्ञा ह्या छंदास दिलेली आढळते. आठ अक्षरांच्या पांच पादांचा एक पंक्ति. ह्याशिवाय विधिविषयक ग्रंथांतून पांच अक्षरांचें एक वृत्ता असा ' पंक्ति ' छंद सांपडतो.
'प द पं क्ति'.- नांवाचा पांच अक्षरांच्या पांच पादांचा एक छंद आहे. तो मागाहून आला असावा. ' अक्षरपंक्ति ' हें वरील छंदासच नांव असावें. ' विष्टरपंक्ति ' नांवाचा पंक्तिचा एक भेद आहे. पिंगलाचार्यांनीं सतोबृहतीला 'सत:पंक्ति' असें नांव दिलें आहे.
त्रि ष्टु भ्.- सहावा छंद ' त्रिष्टुभ् ' हा होय. हा ४४ अक्षरांचा आहे. ' तीन स्तुभांनीं ' म्हणजे खंडांनीं युक्त असा ह्याचा अर्थ आहे. ह्याचें कारण पुढें दिल्याप्रमाणें आहे. प्रत्येक पादाच्या शेवटीं वाचतांना थोडासा विराम जरूर आहे व शेवटचा विराम ऋचेच्या शेवटीं येत असल्यानें तो मोजण्याची जरूर नाहीं म्हणून तो छंद तीनच विरामांनीं युक्त असा होतो. अशा तऱ्हेनेंच 'त्रिष्टुभ्' व 'जगती' हीं एका पादानंतर दुसरा, अशीं म्हणतात.
त्रिष्टुभ् हा ऋग्वेदसंहितेध्यें सर्वांत जास्त ठिकाणीं आलेला छंद होय.
इंद्र व मरुत् ह्या देवतांचीं बहुतेक सूक्तें ह्या छंदांत लिहिलेलीं आहेत. ह्या छंदाचें तीन वस्तूंतील मधलीशीं ऐक्य आहे, किंवा मधली ह्या छंदापाशीं आहे असें हा छंद दाखवितो असा त्याविषयीं अर्थवाद करण्यांत आला आहे. तो अकरा अक्षरांचा आहे असा उल्लेख पुष्कळ ठिकाणीं येतो.
ज ग ती.- शेवटचा छंद म्हटला म्हणजे ' जगती ' हा होय. हा ४८ अक्षरांचा असतो. ' जगती ' म्हणजे चालणारा - जिवंत असणारा- हें नांव बहुतकरून त्याच्या अक्षरसंख्येवरून पडलें असावें. द्युलोक आणि अंतरिक्ष ह्यांचा एक तृतीयांश म्हणजे सर्व आदित्य ह्यानें व्यापले आहेत. ऋग्वेद १. १६४, २५ येथें असें म्हटलें आहे कीं ' द्युलोकांतील सिंधु हा अंतरिक्षाशीं जगतानें म्हणजे जगती छंदानें जोडला गेला आहे. ' ह्या छंदाचें पृथ्वीशीं कधीं कधीं तादात्म्य करतात. परंतु हा घोटाळा पृथिवीचें जें ' जगती ' म्हणून नांव आहे त्याच्या योगानें उत्पन्न होतो. ह्याच व्युत्पत्तिाविषयक कारणानें ह्या छंदाचा जनावरांशीं संबंध लावला जात असावा. प्रत्येक तीन वस्तूंपैकीं तिसरी वस्तु ह्या छंदाजवळ आहे. उदाहरणार्थ, संध्याकाल, पावसाळा वगैरे. ह्या छंदाचा प्रजापतीच्या मध्यापासून म्हणजे उदरापासून उगम झाला. कोणत्याहि १२ वस्तूंच्या समुच्चयाला हा शब्द लावतात व अठ्ठेचाळीस ही संख्या ह्या छंदाच्या नांवानें दाखविली जाते.
वि रा ज्.- चोवीस अक्षरांनीं पूर्ण अशा गायत्रीपासून सुरू होऊन प्रत्येकीं ४ अक्षरांनीं वाढत जाऊन शेवटीं अठ्ठेचाळीस अक्षरांच्या होणाऱ्या ह्या सात छंदाशिवाय एक विराज् ' ह्या नांवाचा आठवा छंद आहे. ह्याची दहा अक्ष रांचे चार पाद अशी विभागणी करतां येते.
ह्या छंदाचा चाळीस अक्षरांचा असा एक व बरेच ठिकाणीं येणारा असा तीस अक्षरांचा एक असे दोन भेद आहेत. विराज् म्हणजे प्रकाशणारा, विविध ठिकाणीं प्रकाशित होणारा असा अर्थ आहे. दुसरा एक असा विराज् आहें कीं त्याचा पाद दहा अक्षरांचा नसून तो अकरा अक्षरांच्या तीन पादांनीं बनतो. ह्यांतील अक्षरें तेहेतीस आहेत. व हा छंद अनुष्टुभ् आणि बृहत्व ह्यांच्यामधील एक पायरी आहे. ह्या छंदाला विशेष महत्त्व देण्याचें कारण असें कीं, ह्यामध्यें उष्णिह्, गायत्री, त्रिष्टुभ्, अनुष्टुभ् वगैरे सर्व छंदांचे गुण आहेत.
स्व रा ज्.- स्वत:ला प्रकाशित करणारा ह्या नांवाचा दुसरा एक छंद आहे. ह्याची रचना अगदीं स्वतंत्र व अनियमित आहे. हा अनियमित आहे हेंच ह्या छंदाचें महत्व आहे. दहा अक्षरांचे दोन पाद व अकरा अक्षरांचे दोन पाद मिळून म्हणजे विराज् ( १० x ४ ) मध्यें व पंक्ति ( ८ x ५ ) मध्यें दोन जास्त अक्षरें मिळविलीं असतां ' स्वराज् ' होतो असें म्हटलें आहे. दुसऱ्या एके ठिकाणीं चौतीस अक्षरांच्या ' स्वराज् ' चा उल्लेख केला आहे. आणखी एके ठिकाणीं तर असें स्पष्ट लिहिलें आहे कीं चौतीस अक्षरांचा प्रत्येक छंद स्वराज् आहे. ह्या व इतर ठिकाणीं आपणांला पुढील छंद:- शास्त्राच्या परिभाषेचा गाभाच सांपडतो.
वर दिलेल्या आठ वृत्तांच्या नांवांखेरीज वेदकालीन वाडमयामध्यें आणखीं कांहीं वृत्तें सांपडतात त्यांत अतिच्छंद हें महत्तवाचें वृत्त आहे.
अठ्ठेचाळिसांपेक्षां जास्त अक्षरें असणाऱ्या कोणत्याहि वृत्ताला ' अतिच्छंद ' हें सामान्य नांव आहे. मोजावयाच्या जुन्या पध्दतीनें अतिच्छंद हें वृत्त सहावें येतें. हें वृत्त 'सहा' ह्या संख्येचें द्योतक आहे. वेवरनें त्याचे गुण व अतिच्छंद शब्दाचे अर्थ दिले आहेत. पुढें ह्याच वृत्ताला ' शक्करी ' असें म्हणूं लागले व शक्करीला ' सप्तपदा ' असें म्हणत. शक्करी शब्दाचा सात पादांच्या रचलेल्या ऋचा, असा अंदाजानें अर्थ लावण्यांत आला आहे.