प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
रामअमात्याचा स्वरमेलकलानिधि.– रामअमात्य या दक्षिणेंतील संगीतज्ञाने इ.स. १२५० च्या सुमारास लिहिलेल्या आपल्या स्वरमेलकलानिधि या ग्रंथात दक्षिणेंतील संगीतपद्धतीचें सविस्तर वर्णन केलेलें आहे.  दक्षिणी पद्धतीसंबंधाने लिहिणारा हा पहिलाच ग्रंथकार होय.  हिंदुस्थानांतील राग ज्यांत एकत्र करुन त्यांचें नीट वर्णन केलेले आहे असा हा पहिलाच ग्रंथ आहे.  हे राग कर्नाटक पद्धतींतील असून ते सर्व षडजांत बसविलेले आहेत.  निदान दक्षिणेंत तरी हल्ली सर्व राग एका विशिष्ट स्वरापासून आरंभ करुन बसविलेले आहेत; आणि यावरुन तिकडे वाद्यसंगीताची पुष्कळच वाढ झालेली आहे असें स्पष्ट दिसते.