प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       
 
मंत्रोत्तर सामविज्ञान- कोणतेहिं शास्त्र विकसित स्वरूपांत एकदम येत नाहीं.तें क्रमाक्रमानेंच वाढत जातें.सामवेद हा ग्रंथ तयार होण्यापूर्वी सामें होतीं ही गोष्ट ऋग्मंत्रांत आलेले उल्लेख दिले आहेत त्यांवरून स्पष्ट होईल.तथापि,गाण्याचें शास्त्र होण्याची क्रिया देखील एकदम झाली नाहीं. जेव्हां एक चाल दुसऱ्या चालींपासून निराळी दिसूं लागते,एक स्वर दुसऱ्या स्वरांपासून भिन्न भासूं लागतो तेव्हां तिचें नामकरण करण्याचा प्रसंग येतो. हा प्रसंग यजु:संहिता तयार होण्यापूर्वीच येऊन गेला होता,हें यजुर्वेदांतील सामांच्या नावांच्या उल्लेखांवरून स्पष्ट होतें.यजुर्वेदाचा आणि ब्राह्मणांचा काळ जवळजवळचाच.तेव्हां कृष्ण यजुर्वेद व ब्राह्मणें यांतील सामनामें येथें देतों.

य जु र्वे दां त आ ले लीं सा म ना में-   रथंतर, बृहत्, वैरूप, वैराज, वैखानस, गायत्र, गौरिवीत, अभिवर्त, क्रोश, सत्र्यस्यर्धि, प्रजाप्रतेर्ह्दय, श्र्लोक, अनुश्र्लोक, भद्र, राजन्, अर्क्य, इलांद, शाक्कर व रैवत.

ऐ त रे य ब्रा ह्म णां त आ ले लीं सा म ना में.- बृहत, रथंतर, वैरूप, वैराज, शाक्कर, रैवत, गायत्र, श्यैत, नौधस, रौरव, यौधाजय, अग्निष्टोमसाम, भास व विकर्ण.