प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
भारतीय संगीतावर बाह्यसंगीताचे परिणाम.– संगीताच्या इतिहासांतील एक महत्वाचा प्रश्न म्हटला म्हणजे त्या संगीतावर झालेले परकीय संगीताचे परिणाम हा होय. याविषयीं आज हेंच म्हणता येईल कीं, भारतीय आर्यन् संगीताचा संबंध द्राविडी, ग्रीक, मुसुलमानी, व यूरोपीय या चार पद्धतींशी आला. द्राविडी संगीताचा संबंध व त्याचे परिणाम फार अनिश्चित आहेत. अशीहि शंका येते कीं, कदाचित आर्यन् लोकांनी सबंध संगीतशास्त्र द्राविडांचे घेतले नसेल कशावरुन ? कां की सामवेदांतील संगीत स्पष्ट नाही. त्याला पद्धति लागली ती प्रातिशाख्यांच्या व शिक्षाग्रंथांच्या काळात. पण ती देखील थोडी. खरी पद्धषत नारदी शिक्षेच्या वेळी लागली असावी. जुने शास्त्रीय ग्रंथ तामीळमध्यें पुष्कळ आहेत. असें शक्य आहे की, द्राविडांमध्ये अर्वाचीन संगीतपद्धतीचा जन्म होऊन त्या पद्धतीने आपले शास्त्र उत्तरकाळी सामें म्हणण्यास लावलें आणि सामवेदास संगीतशास्त्र जोडले गेले. सामांवर असलेले स्वरदर्शक आकडे नवीनच आहेत हेंहि मागे सांगितलेंच आहे.
ग्रीक व हिंदु संगीत पद्धतींचा संबंध विशेषत: साद्दश्य पुष्कळ ठिकाणी वर्णिले आहे. आपल्या बावीस श्रुती व ग्रीकांच्या चोवीस श्रुती, गांधारसारख्या ग्रीकस्पृष्ट देशांचे नांव भारतीय संगीतपद्धतींत शिरणें, वगैरेवरुन व चंद्रगुप्तपूर्व संगीतावरील पद्धतशीर ग्रंथाच्या अभावावरुन ग्रीकांच्याकडून संगीतशास्त्र भारतीयांनी काही तरि उसनें घेतले असावें अशी कल्पना काही ग्रंथकारांनी व्यक्त केली आहे.
संगीतशास्त्राचे वाङमय पुष्कळ मोठें आहे. रा. बरवे यांनी याविषयी केसरींत एक मोठा लेख प्रसिद्ध केला होता. आज संस्कृत व पाकृत संगीत ग्रंथांची नांवे आपण शोधूं लागलो तर हजारावर यादी जाईल. संगीतात आज दोन पद्धती आहेत. त्या दक्षिणात्य आणि हिंदुस्थानी या होत. उत्तरेकडील संगीतावरील ग्रंथ गतकालीन संगीत दाखवितात असे म्हणता येईल. दक्षिणेकडील संगीत ग्रंथ आणि संगीत पद्धति यांमध्ये मात्र एकत्व आहे. संगीत पद्धतींत दोन निरनिराळे संप्रदाय एकत्र करण्याचा प्रयत्न झाला नाही असें नाही. कारण संगीतरत्नाकर सारख्या ग्रंथाचा हेतूच दोहोंचे एकीकरण हा असावा असें दिसतें. तथापि आज दोघांमध्ये द्वैत राहिलें आहे आणि त्यांचे मुख्य कारण स्वरांच्या स्वरुपांतच भेद होय. प्राचीन आर्य संगीत मुसुलमानी काळांत बदलत चालले आणि ग्रंथापासून फरकलेली अशी संगीतकला प्रचारांत आली. हिंदुस्थानी प्रचलित संगीत आणि ग्रंथोक्त संगीत ही भिन्न आहेत. प्रचलित संगीत रा. भातखंडे यांनी बरेचसे पद्धतीत आणिलें. यामुळें सध्या तीन संगीतपद्धती ( म्हणजे स्वरमापन रागनामकरण, इत्यादि बाबतीत भिन्नता ) अस्तित्वांत आहेत.
मुसुलमानांचा संगीतावर परिणाम जो झाला तो संगीत कलेवर झाला. शास्त्रावर फारसा झाला नाहीं. मुसुलमानी काळात अनेक भारतीय शास्त्रें आणि कला यांस उतरती कळा लागली तरी त्यास संगीत अपवाद होतें असे म्हणता येईल. मुसुलमानी अमदानीत संगीतास बराच आश्रय मिळाला. भारतीय ग्रंथांची फारशींत भाषांतरें झाली, आणि टप्पा, गझल वगैरे अनेक प्रकार नवीन आले. तथापि भारतीय संगीतशास्त्रांत फरक झाला नाही; तर नवीन प्रकारांची वाढ होऊन पूर्वीच्या रागात भर पडली एवढेच. याशिवाय वाद्यें कांही वाढलीं असतील ती निराळींच.
भारतीय संगीत कलेवर सध्यांच्या पाश्चात्य कलेचा परिणाम झाला काय ? झाला असल्यास तो कितपत झाला इत्यादि प्रश्नांचे एक उत्तर देतां येईल की, पाश्चात्याचा संबंध नुकताच येऊं लागला आहे आणि त्यामुळें परिणाम मोजतां नाही. नवीन वाद्यें आलीं पण रागपद्धति वगैरेंत भर फारच थोडी पडली. भाषांमध्ये अंतर पुष्कळ, इंग्रजांची छंदोपद्धति स्वराघातावर रचलेली तर भारतीयांची लघुगुरुत्वावर रचलेली इत्यादि कारणांमुळे इंग्रजी कलेचा भारतीय कलेवर फार परिणाम अजून झाला नाहीं.