प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
भारतीय संगीताची मर्यादा.– संगीतकलेची सृष्टि जेव्हां विविध होईल तेव्हां संगीतशास्त्राची वृध्दि व्हावयाची. भारतीयांची संगीतकला कांही कारणामुळें अपुरी होती. प्राचीन भारतीयांच्या संगीतकलेच्या मर्यादा येणेप्रमाणे देता येतील.
(१)अनेक लोकांनी मिळून एकत्र गाण्याचा परिपाठ भारतीयांतील मंत्रपुष्पाशिवाय अन्यत्र दिसत नाही. यामुळे ती पद्धति लक्षात घेऊन संगीतशास्त्राची वृध्दि झालीच नाहीं.
(२)भारतीयांचे संगीत तीन सप्तकांचे आणि पाश्चात्यांचे सात सप्तकांचे असें म्हणता येईल. कां की, भारतीयांत मानवी आवाज आणि तंतुवाद्य यांपासून जो आवाज उत्पन्न होईल तेवढयाचेच वर्गीकरण करण्यांत आले. वाऱ्याचा उपयोग करुन मोठाले आवाज उत्पन्न करणे व त्यांचा संगीत उत्पन्न करण्याकडे प्रयत्न करणे इत्यादि प्रयत्न भारतीयांकडून झाले नाहीत.
(३)भारतीयांच्या संगीतकलेंतील तिसरी मर्यादा म्हटली म्हणजे एकस्वरमालिकासंगीत होय. दोन भिन्न स्वरमालिका एकसमयावच्छेदेंकरुन उत्पन्न करणे आणि त्यांची मधुर योजना शोधणे या क्रिया भारतीयांकडून झाल्या नाहीत.
(४)भारतीय संगीताची चवथी मर्यादा म्हटली म्हणजे ज्यांत पांच, सहा किंवा सात स्वर वापरले जातात तेच त्यांनी राग म्हणजे संगीताचा विषय मानले ही होय. भारतीय संगीतशास्त्राच्या इतिहासांत आपल्या संगीतशास्त्राला अशा तऱ्हेचें मर्यादित स्वरुप कां आलें याचाहि विचार केला पाहिजे.