प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 

भवभट्ट.- यानंतरचा महत्वाचा ग्रंथकार भवभट्ट हा होय.  अमुपसिंह नांवाच्या एका राजाच्या दरबारी हा होता.  त्याचें घराणें माळव्यांतील आभीर प्रांतांतले असून त्याचा बाप जनार्दनभट्ट, शहाजहानाच्या दरबारी गवई होता.  शहाजहानाने “कविराज अशी पदवी ज्याला दिली तो जगन्नाथ हाच असावा असे रे. पापले यांस वाटते; हे घराणें मूळ दक्षिणेकडे असावें असें यास वाटते.  कारण भवभट्ट याला दक्षिणेकडील संगीतपद्धतीची बरीच माहिती होती असें दिसतें.  त्यानें सर्व रागांचे २० थाटांमध्ये वर्गीकरण केले आहे; आणि त्याचे शुद्धसप्तक कनकांगी हेंच आहे.  कनकांगी हें दक्षिणेकडील शुद्धस्वरसप्तक होय हें वर दिलेंच आहे.  भवभट्टानें उत्तरेकडील राग दक्षिणेकडील संगीतपद्धतींत बसविण्याचा प्रयत्न केला आहे.

याच सुमारास पुरंदर विठ्ठल यानें कानडी भाषेंत पुष्कळ सुंदर पद्ये लिहिली.  ती आज संगीताचे विद्यार्थी आरंभी म्हणावयास शिकत असतात.