प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       

ब्राह्मणे.- सामवेदसंहिता म्हणून जे वाङमय आहे त्यात केवळ सूक्तें आहेत.  त्या सूक्तांची रचना कशी केली वगैरे वर्णन मागें येऊन गेलेंच आहे.  त्यात याज्ञिकशास्त्रहि नाही.  ते विधिवाक्यांचे संग्रहस्थान जी ब्राह्मणे त्यांत आहे.  यज्ञास उद्देशून संगीतयोजना कशी करावी हे सांगणारे ग्रंथ म्हणजे सामवेदांतर्गत ब्राह्मणे, त्याकडे वळले पाहिजे.

गायनशास्त्र सामवेदाची पूर्ण वाढ होईपर्यंत कसे वाढत गेले याचा पत्ता लागत नाही.  ते ज्ञान गुरुपरंपरेने संप्रदायांतच राहिले असावे.

सामवेदाची जी ब्राह्मणें आहेत ती संगीतशास्त्र न सांगता तें शास्त्र सामकांस ठाऊक आहें धरुन चालतात.  त्या शास्त्राचा यज्ञाकडे उपयोग कसा करावा एवढाच काय तो तीं बोध करतात.  मधून शास्त्रीय माहिती आलीच तर ती केवळ अनुषंगाने म्हणून येते आणि ती देखील ब्राह्मण ग्रंथांपेक्षा सूत्रग्रंथात अधिक येते.  हे विधान स्पष्ट करण्यासाठी सामवेदावरील प्रत्येक ब्राह्मणाच्या अंतरंगाचे थोडेंसें स्वरुप देतो.  वाङमयवर्णनानंतर तदंतर्गत शास्त्राकडे लक्ष देऊ.