प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       
   
ब्राह्मणांतील इतिहासाची व इतर उल्लेखरूपी साहित्याची किंमत- ऋग्वेदामध्यें रथंतर हें साम वसिष्ठानें प्रचारांत आणलें व बृहत्साम हें भरद्वाजानें तयार केलें (आचके), असे उल्लेख आले आहेत. ब्राह्मणांमध्यें जो इतिहास दिला असेल तो देखील अविश्र्वसनीय होय. कारण, कोणत्या तरी क्रियेच्या समर्थनासाठीं इतिहास म्हणून वाटले ती वात ठोकून द्यावयाची ही पद्धति ब्राह्मणांमधील अर्थवादांत दिसून येते. तथापि तें उल्लेखरूपी साहित्य देखील उपेक्षा करण्याजोगें नाहीं. कां की, त्यांत बरीचशीं सामांची नावें सांपडतात; आणि ज्यांचा ''इतिहास'' देण्याची अर्थवादांनी खटपट केली त्यांचें अस्तित्व बरेंच जुनें असल्याखेरीज त्यांविषयी मारलेली थाप पचली गेली नसती असेंहि त्यावरून अनुमान काढतां येतें.आपणांस सामवेदावरील ब्राह्मण ग्रंथांत हें शास्त्र परंपरागत कसें चालत आलें व मधून मधून काहीं ऋषींनीं भिन्न पद्धति अंगीकारून भिन्न शाखा कशा स्थापन केल्या याबद्दलच्या याद्या आढळतात. बहुतेक परंपरा ब्राह्मणपर्यत नेऊन भिडविलेल्या दिसतात. निरनिराळया ब्राह्मणांतील परंपरा व भिन्नभिन्न शाखांच्या याद्या अनेक अंशी एकमेकांशी जुळतात पण मधून मधूनच काहीं व्यक्ती भिन्न दिसतात.