प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          

प्रगाथ म्हणजे काय.- ऋग्वेदाच्या आठव्या मंडळाच्या काल्पनिक द्रष्टयास प्रगाथ म्हणतात. ऋग्वेद मंडळ ८ याला प्रागाथमंडल म्हटलें आहे ( ऐ. आरण्यक २.२,१). अनुक्रमणीप्रमाणें आठव्या मंडलांतील १, १०, ४८, ५१ ते ५४ या सूक्तांचा द्रष्टा प्रगाथ आहे व त्याला अनुक्रमणी घोरपुत्र म्हणते. ऋग्वेदांत प्रगाथाचा व्यक्तिवाचक उल्लेख नाहीं. आठव्या मंडळांत पुष्कळ ऋचा प्रगाथ छंदांत आहेत. प्रगाथ हें नेहमीचें वृत्त नव्हे. तर मूळ वृत्ताची कृत्रिम मोडतोड करून  प्रगाथ बनविण्यांत येई. होता नामक ऋत्विज जें शस्त्र पठन करतो त्यांतील पहिल्या तीन ऋचांनां स्तोत्रिया व दुसऱ्या तीन ऋचांनां अनुरूपा असें नांव आहे. जेव्हां या स्तोत्रिया व अनुरूपा नामक ऋचा तीन तीन नसून दोन दोनच असतात तेव्हां त्यांनां, अथवा ज्या दोन ऋचांच्या कांहीं विशिष्ट प्रकारानें तीन ऋचा केल्या जातात त्या ऋचांनां प्रगाथ ही संज्ञा देतात. या प्रगाथांनां त्या मंत्रांतील देवतांवरून ब्राह्मणस्पत्यप्रगाथ, इंद्रनिहवप्रगाथ, सामप्रगाथ, मरुत्वतीयप्रगाथ, अच्युतप्रगाथ अशीं निरनिराळीं नावें दिलीं आहेत. प्रगाथस्वरूप आश्वलायनसूत्रानें ( . १५ ) ' तां द्वे तिस्त्रस्कारं शंसेत् ! चतुर्थषष्ठौ पादौ पुनरभ्यसित्वा ' असें वर्णिलें आहे. प्रगाथाच्या दोन ऋचांच्या तीन ऋचा बृहती छंदांत करणें याला ' बार्हत-प्रगाथ ' असें नांव आहे. त्या तीन ऋचा करतांना प्रगाथाच्या दोन ऋचांच्या आठ चरणांपैकीं चौथा आणि सहावा चरण यांचा पुन:पुन: अभ्यास म्हणजे पठन करावयाचें.

उदाहरणार्थ,

१ प्रनूनं ब्रह्मणस्पतिर्मंत्रं वदत्युक्थ्यं । यस्मिन्निंद्रो वरुणो मित्रो अर्यमा देवा ओकांसिचक्रिरें ॥

२ तमिद्वोचे माविदथेषु शंभुवं मंत्रं देवा अनेहसं । इमांच वाचं प्रतिहर्यतानरोविश्वेद्वामावो अश्नवत् ॥

या प्रगाथाच्या दोन ऋचा. यांच्या बृहतीछंदांत तीन ऋचा करावयाच्यात्र बृहती छंदाचीं अक्षरें ३६ आहेत. तीन ऋचा करावयाचा प्रकार पुढील प्रमाणें:-

( १ ) प्रनूनं ब्रह्मणस्पतिर्मंत्रंवदत्युक्थ्यं । यस्मिन्निंद्रो वरुणो मित्रो अर्यमा देवा ओकांसि चक्रिरों ३

(२ ) देवा ओकांसि चक्रिरे देवा ओकांसि चक्रिरे । तमिद्वोचे माविदथेषु शंभुवं मंत्रं देवा अनेहसों ३

( ३ ) मंत्रं देवा अनेहसं मंत्रं देवा अनेहसं । इमांच वाचं प्रतिहर्यता नरो विश्वेद्वामावो अश्नवों ३ ॥

वरील उदाहरणांत प्रगाथाच्या दोन ऋचांच्या आठ चरणांपैकीं चौथा आणि सहावा या चरणांचें पुन: पुन: पठन केल्याचें आढळून येईल.