प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
निदानसूत्रें.- आतां निदानसूत्रांकडे लक्ष देऊं त्यांतील महत्तवाचे मुद्दे येणेंप्रमाणें :-
पा द.- आतांपर्यंत छंद:शास्त्रामध्यें अक्षरसंख्येला जास्त महत्व दिलेलें दिसून आलें. परंतु आतांच प्रथमत: उपांत्याच्या मात्रांवर उभारलेली वृत्तपध्दति आपणांस दिसून येते. ही पद्धत ऋग्वेदप्रातिशाख्यांमध्यें आहे. कुहन साहेबांनीं आपल्या ' वेदांतील वृत्तासंशोधन ' ह्या ग्रंथांत ह्या नियमालाच ' मात्रांचा नियम ' असें नांव दिलें आहे. व हा नियम वेदांतील सूक्तांतूनच स्पष्ट निघतो असें त्यांचें मत आहे. येथें ' वृत्ति ' ह्या शब्दाच्या ऐवजीं ' वृत्त ' हा शब्द वापरण्यांत आला आहे. ' गायत्री चतुष्पदा ' येथें नवीनच दृष्टोत्पत्तीस येते.
उष्णिह् छंदासंबंधानें एक नवीनच गोष्ट सांगण्यांत आली आहे. अनुष्टुभ् छंदासंबंधानें दोन नवे नियम दिले आहेत. बृहतीसंबंधानें कांहीं नवीन माहिती दिली आहे. पंक्ति छंदाचे प्रकार दिले आहेत. त्रिष्टुभ् व जगती या वृत्तांसंबंधीं कांहीं माहिती देऊन विराज्, अतिच्छंद, व मध्यंतरी येणारीं वृत्तोंहि दिलीं आहेत. अतिच्छंदाचा अर्थ व त्याचे प्रकार दिले असून मध्यंतरीं असणाऱ्या वृत्तांचे सातसातांचा एक असे तीन समुदाय केले आहेत. ' द्वापर ' वृत्तोंहि या ग्रंथांत आलीं आहेत.
स दो ष वृ त्तें.- निचृत् आणि भुरिज् ह्यांमध्यें अनुक्रमें एक कमी व एक अधिक अशीं अक्षरें असतात. त्रेता आणि कलि हीं देखील अशाच प्रकारचीं वृत्तें आहेत. पुढील चार मुद्दे लक्षांत ठेवले म्हणजे वृत्त सहज ओळखूं येतें. हे मुद्दे म्हटले म्हणजे पाद, अक्षरें, जात व स्थिति हे होत.
दे वां चीं वृ त्तें:- प्रजापतीचें वृत्ता येथें दिलें असून देव व असुर यांचींहि वृत्तें दिलीं आहेत. श्लोक हा शब्द पद्य ह्या सामान्य अर्थानें येथें वापरला आहे.
य ती उ र्फ वि रा म स्था नें.- तीन, चार, पांच, सहा, सात किंवा आठ पादांच्या पद्यांत यतिस्थान कोठें घ्यावें ह्याविषयीं पिंगलकानें निर्देश केला आहे, पण तो वैदिक वृत्तांसंबंधीं नसून उत्तारकालीन वृत्तांसंबंधीं आहे.
अ क्ष र सं को चा दि प्र का रां नी के ले ली वृ त्ता र च ना.- अक्षरसंकोच ( प्रश्लिष्टम् ), दीर्घीकरण ( अभिनिहितम् ), लोप ( क्षिप्रसंधि ), छेदन ( उपाद्रुतम् ) व पूर्ण स्वराचें अर्धस्वरांत पर्यवसान ह्यांचाहि विचार करण्यांत आला आहे.
वरील नियमांवरून ही एक गोष्ट निदर्शनास येते कीं, वैदिक ग्रंथांचें आजचें वर्णोच्चारदर्शक स्वरूप, ज्या मूळच्या परिस्थितींत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हांच्यापेक्षा भिन्न आहे. मूळ परिस्थितींतील वर्णोच्चारदर्शक स्वरूपासंबंधानें कुहन् साहेबानें केलेल्या संशोधनास परंपरागत दंतकथांनींहि पाठिंबाच मिळतो.
दुसऱ्या पटलांतील शेवटचें पद्य पहिल्या पटलाच्या सुरुवातीचा आधार घेतें व त्या पद्यामुळें हीं दोन्ही पटलें एकच विषय सांगणारीं व पूर्ण आहेत ह्या गोष्टीला पुष्टि येते.
सारांश, पद्यभागाचा विस्तार कसा झाला व उपांत्याच्य लघुगुरुत्वावरून एखादें वृत्त कसें ओळखावें यासंबंधीं माहिती या पुस्तकावरून मिळूं शकते. नेहमीचें सात छंद व विराज् हे यांत निरनिराळे विवरण करून दाखविले आहेत. अतिच्छंदाचें सात समुदाय व मध्यंतरी असलेल्या एकवीस वृत्तांचे समुदाय अशा दोन समुच्चयांचाहि यांत विचार केला आहे. पुढील भागांत सदोष वृत्तें आणि त्यांचे व्यवस्थित आकार देऊन त्यांचें नियमन व त्याचप्रमाणें देव व असुर ह्यांचीं कल्पित वृत्तें दिलीं आहेत. याशिवाय पद्य म्हणतांना विराम कोठें घ्यावा, सदोष वृत्तांत अक्षरें कोठें घालावीं व कोठें एका पदाचे तुकडे करावयास पाहिजेत हें सर्व यांत दिलें आहे.