प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
प्राकृत पैंगल.- या ( कलकत्ता १९०२ ) पुस्तकामध्यें दोन परिच्छेद आहेत. पहिला परिच्छेद मात्रागणवृत्तांकडे दिला आहे आणि दुसरा अक्षरगणवृत्तांकडे दिला आहे. दुसऱ्या परिच्छेदांत संस्कृत वाङमयात वापरली जाणारी वृत्ते बरीच दिली आहेत. मात्रागणवृत्तांमध्ये दिेलेल्या वृत्तांत संस्कृत ग्रंथात वापरली न जाणारी वृत्ते बरीच आहेत.
या पुस्तकात आणि वेदांग म्हणून समजल्या जाणाऱ्या ग्रंथांत साम्य पुष्कळच आहे. प्राकृत पिंगल हा ग्रंथ पिंगलाचा नव्हे असें कित्येक ग्रंथकार म्हणतात पण दोन्ही ग्रंथांचे कर्ते भिन्न आहेत हे चांगले सप्रमाण सिद्ध झाले नाही.
आता “पिंगला”च्या प्राकृत वृत्तांवरील ग्रंथाकडे लक्ष देऊ. हा ग्रंथ कोणा तरी एका स्त्रीस उद्देशून लिहिला आहे असे दाखवितो. यांत पिंगलाचा आधारभूत गतव्यक्तीसारखा उल्लेख आहे. पहिल्या भागांत जे विषय आले आहेत त्यांचे थोडक्यात स्वरुप येणेप्रमाणे : श्लोक १-५४ पर्यंत सामान्यशास्त्रीय विवेचन आहे आणि श्लोक ५४-२०९ पर्यंत विशिष्ठ मात्रावृत्तांच्या व्याख्या आणि उदाहरणें आहेत. परंतु मधून मधून आगंतुक भाग आलाच आहे. या वृत्तांमध्ये मरहट्टा म्हणून वृत्त आहे ते आपल्या सवाई सारखें आहे. यात चौपाई वृत्त चउपइआ या नावानें आलें आहे. ही मात्रावृत्तें तपासून त्यांची व निरनिराळया देश्य भाषांतील वृत्तांची व पदांची संगति लावणे हें काम बरेच इतिहासूचक होईल असे वाटते.
वृत्तांचे विवेचन करतांना “पुढे अनुस्वार विसर्ग येतो, संयोग ऱ्हस्वास गुरुत्व देतो.” या नियमास त्यांनी उच्चार होत नसलेल्या अनुस्वारांची अक्षरे आणि जोडाक्षरें पुढें आली असतांहि पूर्वीच्या लघु अक्षराचें लघुत्व जात नाही अशा तऱ्हेची कांही उदाहरणें दिली आहेत आणि लघु अक्षरास त्या प्रसंगात गुरुत्व देण्याचा नियम कठोरतेने वापरुं नये नाही तर काही अस्तित्वांत असलेल्या काव्यांच्या मात्रा छंदोनियमापेक्षा अधिक होतील असे सांगितलें आहे. प्रत्यक्ष ऱ्हस्व उच्चार असला तरी छंद साधण्यास त्याचा दीर्घ उच्चार करावा लागतो, आणि दीर्घ अक्षराचा ऱ्हस्व उच्चार करावा लागतो, तथापि या तऱ्हेची मोकळीक कोणी वापरुन छंदाचे नियम बिघडवूं नये म्हणून मनाची तडफड या सर्व गोष्टी श्लोक २-११ पर्यंत दिसून येतात.