प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
प्राकृत पिंगलाची मात्रापद्धति– सहा मात्रांचा गण पांच मात्रांचा गण, मात्रांचा गण असे त्याने द्विमात्रे पर्यंत धरले आहेत आणि प्रत्येक मात्रासमुच्चयाचे आद्यगुरु, अंत्यगुरु असे अनेक भाग पाडिले असून त्यांस नांवें दिली आहेत, जर कोणास पुष्कळशी नांवें गोळा करावयाची असतील तर त्यास प्राकृत पिंगल हा ग्रंथ उपयोगी होईल.
प्राकृत पिंगलामध्ये आज छंद:शास्त्राबाहेरचे समजलें जाईल असेंहि विवेचन आहे. उदाहरणार्थ गणदेवता,गणांचे मित्र,गणफल याविषयीचें विवेचन होय. पृथ्वी, जल, शिखी, वात इत्यादि गणांचे इष्ट देव धरले आहेत. मगण, नगण हे मित्रगण होत तसेच कांही वैरिगणहि आहेत. मगण ऋध्दि, व स्थैर्य देतो अशा प्रकारचे विचारहि ग्रंथांत आले आहेत.
गणांचें प्रस्तारविवेचनहि या ग्रंथांत बरेंच आले आहे. एकापासून सवीस पर्यंत अक्षरांची वृत्तें घेतलीं आणि त्यांत लघु गुरू यांचाहि विकल्प घेतला तर एकंदर अक्षरयोजना किती होतील याप्रकारें विवेचन करून १३४२१७७२६ इतके प्रकार होतील म्हणून सांगितलें आहे. आांकडेमोडी करुं इच्छिणाऱ्यांनी हें गणित बरोबर आहे किंवा नाहीं तें पहावें.
मात्रागणवृत्तांत,अनेक वृत्तें दिलीं आहेत. उदाहरणार्थ थोडीं वृत्तें येथें देतो. (१) गाहू-मात्रा २७; (२) गाथा-मात्रा १२,१८; लक्षण गीतिप्रमाणें. गाथेमध्येंच लक्ष्मी, उग्गाहा, वगैरे सूक्ष्म भेद दिले आहेत. (३) विगाथा- पूर्वार्धीं २७, उत्तरार्धी ३०. (४) गाहिणी-पूर्वार्ध ३०,उत्तरार्ध ३२ (५) सिंहिणी-गाहिणीच्या उलट ३२,३०. (६) स्कंधक- चार मात्रांचा एक गण असे आठ गण, स्कंधकाचे पुढें २८ भेद दिले आहेत. (७) दोहा-पाद चार मात्रा १३,११,१३,११.दोहावृत्ताचे त्यास भद्र, शेषण, सारंग इत्यादि नावे आहेत. भ्रमरशभादि भेद दिले आहेत.(८) रसिकावृत्त-चार लघु, चार लघु, तीन लघु अशा ११ लघु अक्षरांच्या ६ पंक्ती.(९) रोला-चोवीस मात्रा मधुन मधुन गुरू अक्षर.(१०) गंधाना वृत्त-पहिल्या ओळींत ७अक्षरें, दुसऱ्या ओळीत १८ अक्षरें, यमक साधणें.(११) चौपाई (चतुष्पादिका) प्रत्येक पादांत चार मात्रांचे ७ गण व एक गुरू म्हणजे ३० मात्रा.
या प्रकारें आपल्या वृत्तविवेचनांत निरनिराळी तत्वें प्राकृत पैंगलाने आाणलीं आहेत असें दिसून येईल. अक्षरवृत्तें बहुतेक संस्कृत ग्रंथकारांच्या परिचयाचींच आाहेत.