प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
प्राचीन लौकिकगान आणि सामपरंपरा.– सामवेदाची परंपरा अधिकाधिक स्पष्ट होण्यासाठीं संहिता व ब्राह्मणें यांचा आणि सामवेदाच्या विषयावरील इतर ग्रंथांचा संबंध अवगमिला पाहिजे. ज्या गुरुपरंपरा मागे वर्णिल्या आहेत त्या तुटल्या काय व तुटल्या असल्यास केव्हां आणि कशा तुटल्या याचे विवेचन येथें करता येण्यास अवश्य तितकी साधने उपलब्ध झाली नाहीत.
लौकिक गानाकडे वळलेली मंडळी सर्व सामवेद्यांतून निघाली असणे शक्य नाही. कां, की, कोणत्याहि कलेंतून जेव्हां शास्त्र उत्पन्न होते तेव्हां कलेचे सर्वच उपासक शास्त्राकडे वळत नाहीत. यज्ञसंस्थेने सर्व गायकांचा वर्ग आपल्याकडे ओढून घेतला असेल हेंहि शक्य नाही. त्यामुळे सामवेदाची परंपरा म्हणजे यज्ञ आणि तदंतर्गत संगीत जाणणारा वर्ग एकीकडे पडून कलेचा विकास होत जाणे शक्य आहे. कलेची व्यवस्थित मांडणी करणारा वर्ग निघाला म्हणजे तो पूर्वीच्या शास्त्रीकरणाच्या परिश्रमाकडे लक्ष देणार. पण तो केवळ पूर्वशास्त्रानुषंगी नसतो. लक्ष्यसंगीत आणि लक्षणसंगीत असे जे भेद आज उपस्थित झाले आहेत ते देखील शास्त्रकर्त्यांचे स्वातंत्र्यच दाखवितात. तीच क्रिया पूर्वीहि झाली असावी, आणि त्यामुळे सामवेदांतर्गत सप्त स्वर आणि उत्तरकालीन सप्त स्वर यांची संगति लावण्यास अडचण उत्पन्न होत असावी.
लौकिक गानाची प्राचीन परंपरा जरी आपणांस दिसत नाही, तरी सामसंगीताची जी परंपरा स्थापित झाली ती आपली शास्त्ररचना काहीं काळपर्यंत जगवून ठेवीत होती असे दिसते. ही क्रिया समजण्यासाठी संहिताब्राह्मणोत्तर सामवाङमय आणि सामवेदवाङमय यांचे ऐतिहासिक सूत्र लक्षात घेतले पाहिजे. या विषयावर डॉ. बर्नेल यांनी आर्षेय ब्राह्मणाच्या प्रस्तावनेंत जें लिहिलें आहे त्याचा गोषवारा मागे दिलाच आहे.
आतां सामवेदांतर्गत संगीतशास्त्राच्या वृध्दीविषयी विचार व्यक्त केला पाहिजे. याचे कांही विवेचन वाङमयविकास स्पष्ट करताना केलेंच आहे. पण त्याचबरोबर हेंहि सांगितले पाहिजे की अस्तित्वांत असलेल्या ग्रंथांवरुन आम्हांस समांतर्गत संगीताविषयीं व त्याच्या लौकिक गानाविषयी समाधानकारक बोध झाला नाही. याचा संबंध जोडण्याचें कार्य करण्यास जो परिश्रम व खर्च करावा लागणार तो आमच्याकडून झाला नाही. तेव्हां आम्ही जी माहिती देत आहों ती अपूर्ण आणि असमाधानकारक आहे असे सांगूनच जे काय प्राप्त झाले ते पुढे मांडीत आहोत.