प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
भक्तिमार्गाच्या उदयाचा दक्षिण हिंदुस्थानांतील संगीतावर परिणाम.– इसवी सनाच्या ७ व्या व ८ व्या शतकांत दक्षिण हिंदुस्थानांत लोकांमध्ये नवी धार्मिक जागृति दिसूं लागून भक्तिमार्गाचा उदय झाला आणि त्याबरोबर शिव आणि विष्णु यांच्या भक्तिीचे संप्रदाय विशेष लोकप्रिय झाले. ह्या धर्मजागृतीची लाट लोकांमध्ये लांब दूरवर पसरविण्याचें काम या जागृतीच्या पुढाऱ्यांनी रचलेल्या भक्तिविषयक पद्यांनी विशेष केले. त्यामुळें साहजिकच इश्र्वरभक्तीबरोबर संगीतालाहि बरेंच चालन मिळून त्याची वाढ झाली, आणि संगीताचे शिक्षणहि लोक बऱ्याच प्रमाणांत घेऊं लागले. ज्या जुन्या रागात ही पद्ये म्हणत असत ते हल्लीं प्रचारांतून नाहींसे झालेले आहेत. परंतु त्रावणकोरमध्यें जे इंदीस, इंदलम्, पाडि, पुरनिर, वगैरे प्राचीन त्रावणकोरी राग आज प्रचलित आहेत, त्यात वरील रागांपैकी कांहींचा समावेश होतो असें त्रावणकोरकडील लोकांचे म्हणणें आहे. पश्चिम घाट आणि समुद्रकिनारा ह्यांच्यामध्ये जो सुंदर चिंचोळा भूप्रदेश आहे व ज्याचा त्रावणक्रोर हा एक भाग आहे त्या प्रदेशाचा इसवी सनापूर्वी कित्येक शतकें इतर देशांशी मोठा व्यापार चालू होता. या प्रदेशांत त्या वेळी चेर वंशांचे राज्य होतें. चेर वंशातील राजांचे राज्य कांहीं काळ तर सर्व दक्षिण हिदुस्थानभर पसरलेलें होतें. या राज्यांत प्राचीन तामीळ संस्कृति पसरलेली असून त्या वेळीं उत्तर हिदुस्थानांतील पवित्र क्षेत्रांमध्ये वास करीत असलेल्या संस्कृत संस्कृतीशी तिची स्पर्धा चालू होती. तात्पर्य, या काळात या चेर वंशाच्या राज्यांत एक संगीतपद्धति भरभराटींत असल्यास त्याबद्दल आश्चर्य करण्याचें काहीं कारण नाहीं. या पद्धतीचे अवशेष अद्यपि तिकडील प्रदेशांत आढळतात. येथें हेंहि नमूद करणे अवश्य आहे की, याच वेळी यूरोपमध्ये ग्रेगरी दि ग्रेट हा ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्याकरतांच तिकडील संगीताची वाढ करण्यात गुंतलेला होता.