प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
भरताचें नाटयशास्त्र.– हिंदुस्थानांतील संगीत शास्त्रावरचा सर्वांत जुना आणि विस्तारपूर्वक लिहिलेला ग्रंथ म्हटला म्हणजे भरताचार्यानें रचलेला नाटयशास्त्र हा होय.  हा ग्रंथ सहाव्या शतकाच्या आरंभी झाला असें सामान्यत: मानतात.  हा ग्रंथ तयार करण्यापूर्वी भरतानें नाटयसूत्र या नांवाचा ग्रंथ लिहिला होता असा एके ठिकाणीं उल्लेख आहे.  परंतु तो आज उपलब्ध नाहीं.  भरताच्या नाटयशास्त्रापैकी संगीतशास्त्राचें विवेचन करणारें असे फक्त एकच प्रकरण आहे.  त्या प्रकरणात स्वर, श्रुती, ग्राम, मूर्च्छना व जाती यांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.  भरताचार्याने या ग्रंथात प्रतिपादिलेलीं संगीतशास्त्राची तत्वें आजहि हिंदी संगीतांत प्रचलित आहेत.  भरताचार्याने आपली संगीतपद्धति कशी बनवली ह्याचें ज्ञान चालू पिढयांतील लोकांनां सहज समजण्यासारखें नाहीं.  प्रो. भानूंनी मराठींत थोडासा गोषवारा रंगभूमी मासिकांत प्रसिद्ध केला आहे.  संगीत प्रकरणांतील काही भागांचे भाषांतर क्लेमेंटकृत ‘हिंदी संगीत शास्त्रप्रवेश’ या नांवाच्या ग्रंथात दिलेलें आहे; आणि जीन ग्रॉसेट याने फ्रेंच भाषेत ह्या प्रकरणाचे संपूर्ण भाषांतर केलें आहे.  परंतु जीन ग्रॉसेटचें भाषांतर बिनचूक आधार म्हणून मानतां येत नाही.  कारण, त्याने ‘स्वर’या शब्दाचा अर्थ ‘अंतराखालील ध्वनि’ असा केलेला आहे.  पण भरताचार्यानें स्वर हा शब्द अंतरास उद्देशून मूळ योजलेला आहे; आणि केवल दुय्यम अर्थानें ‘अंतरापुढील ध्वनिस’ लावलेला आहे.  यामुळे जीन ग्रॉसेटनें केलेले स्वरनामांचे भाषांतर पुन्हां शुद्ध केलें पाहिजे.

मद्रास इलाख्यांतील पदुकोटा संस्थानांतल्या कुदुमीया मालै येथे सांपडलेल्या एका शिलालेखात संगीतासंबंधाने बरेच उल्लेख आहेत.  हा लेख सातव्या शतकांतला असावा.  त्यामध्यें सात जाती, कांही थोडक्या श्रुती आणि सात स्वर यांचा नामनिर्देश आहे.  ‘अंतर’ आणि ‘काकली’ यांनी ‘ग’ व ‘नी’ यांच्या तीव्र श्रुती अनुक्रमें वर्णिलेल्या आढळतात.  आजहि दक्षीणेतील संगीत शास्त्रीय पारिभाषिक शब्दांत हा विशेष आढळून येतो.  ह्या शिलालेखांतील मजकूर म्हणजे सामगायकानें म्हणावयाचें एक गाणेंच असून त्यांत पुष्कळ ठिकाणीं असलेल्या विशिष्ट खुणा सामगायनांतील चिन्हें असावीत असा कित्येकांचा तर्क आहे.