प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
भारतीय संगीत पद्धतींतील फरक– ह्या सर्व गोंष्टींवरुन आपणांस असा सिध्दांत बांधतां येईल कीं, रि, ग, ध, नि ह्या चार स्वरांच्या किंमती अनुक्रमें २५६, २७०, ३८८, ४०५ असतील ते ग्रंथ एका पध्दतीचे समजावे किंवा दुस-या शब्दांनी असें म्हणूं कीं, ज्या ग्रंथाचा शुध्द स्वरांचा राग मुखारी अथवा कनकांगी ते सर्व ग्रंथ एकच पध्दति प्रतिपादन करणारे होत. ह्या पध्दतीपैकी उपलब्ध ग्रंथांत स्वरमेलकलानिधि हा ग्रंथ जुना मानण्यास हरकत नाहीं. ही पध्दति म्हणजे दक्षिण पध्दति असें आपण म्हणूं. असे दक्षिण पध्दतीचे ग्रंथ आज १०I१५ छापून प्रसिध्द झाले आहेत. त्याचप्रमाणें रि, ग, ध, नि ह्या चार स्वरांच्या किंमती अनुक्रमें २७०, २८८, ४०५, ४३२ अशा असतील ते ग्रंथ एका पध्दतीचें समजावे; त्यांस आपण उत्तर पध्दतीचे ग्रंथ असें म्हणू; अथवा दुस-या शब्दांनीं बोलावयाचें तर काफी शुध्द स्वरमेलाचे ग्रंथ असें म्हणूं, कारण, ह्यांच्या सात स्वरांच्या किंमती हल्लीं ज्या रागाला हिंदुस्थानांत काफी राग मानितात, त्याच्या सात स्वरांच्या किंमतींप्रमाणे आहेत. तेव्हां अहोवलाचा पारिजात ग्रंथ उत्तर पध्दतीचा व त्याचा शुध्द स्वरमेळ काफी असें म्हणूं. ह्या पध्दतीचे ग्रंथ आज संगीतपारिजातासह पांच छापून प्रसिध्द झाले आहेत.
चतुर पंडिताच्या शुध्द सात स्वरांप्रमाणें ज्या ग्रंथाच्या किंमती असतील ते ग्रंथ एका पध्दतीचे होत. त्या शुध्द स्वरांच्या मेळास आपण विलावल मेळाचे ग्रंथ समजूं. हा ग्रंथ प्रचलित उत्तर पध्दतीचा असें म्हणूं. म्हणजे पं. अहोबल व चतुर पंडित ह्यांमधील भेद स्पष्ट ध्यानांत येईल. अशा रीतींने संस्कृत ग्रंथांचे तीन वर्ग झाले. मुखारी अगर कनकांगी मेळाचे ग्रंथ, काफी शुध्द मेळाचे ग्रंथ व विलावली शुध्द मेळाचे ग्रंथ.
आतां अगदीं अलीकडे ज्या पाश्र्चात्य संगीत पध्दतीशी आपला संबंध आला आहे तिची वाढ कशी झाली तें थोडक्यांत पाहूं.
भारतीय व यूरोपीय संगीताचा संबंध मुख्यत: दोन किंवा तीन कालांत येतो. मूलगृहकालीन संगीत कदाचित् एकच असेल; आणि त्यामुळें प्राचीन ग्रीक व प्राचीन भारतीय यांच्या संगीतांत मूलत: सादृश्य असेल. पण त्याविषयी आज शोध करतां येणें शक्य नाहीं. कां की, मंत्रकालीन सामांच्या संगीताची आज आपणांस माहीती नाही, तर ज्या राष्ट्राचें वाड्ययहि बरेंचसें उत्तरकालीन त्यांची प्राचीनसंगीतपध्दति आज आपण कशी आजमावणार. त्या अर्थी याविषयी आपणांस फारसें लिहितां येत नाहीं. दुसरा काळा पायथ्यागोरसचा. पायथ्यागोरसनें सप्तस्वरमालिका हिंदुस्थानांतून किंवा इजिप्तमधून यूरोपांत नेही असा प्राचीन काळापासून यूरोपीयांचा समज आहे. तथापि अलीकडे ग्रीकांस सप्तस्वरोप्तत्ति व श्रुतिकल्पना यांचें श्रेय देण्याचा प्रयत्न हिंदुस्थानांतील कांही इंग्रज ग्रंथकार करीत आहेत. ग्रीकांचा प्राचीन भारतीय नाटयकलेवर संस्कार झाला तसा संगीतावरहि झाला असणे शक्य आहे. तसाच भारतीयांच्या संगीतज्ञानाचा परिणाम यूरोपावर त्या काळीं झाला असेल पण तो कोणता हें निश्र्चयानें सांगता येत नाहीं. सध्यां भारतीय संगीताचा अभ्यास यूरोपीय संगीतज्ञ करुं लागले आहेत पण त्यांच्या संगीतावर परिणार होण्याचा काल अजून यावयाचा आहे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटल्यास यूरोपीय संगीत हें स्वतंत्र धरुन त्याचा विकास लिहिणें योग्य होणार नाहीं.