प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
पिंगलाचार्यांचें छंद:सूत्र.- वेदकालीन वृत्तांविषयीं या ग्रंथांत फारच थोडा विचार केला आहे. बहुतेक विधिविषयक ग्रंथांतून न येणाऱ्या वृत्तांनांच फार महत्व दिलें आहे. सदरहूप्रमाणेंच पाणिनीच्या व्याकरणाची स्थिति आहे. ह्या व्याकरणास व ह्यावरील कात्यायनानें व पतंजलीनें केलेल्या विवरणास व्याकरणविषयक वेदांग असें मधुसूदन वगैरे म्हणतात खरें; परंतु ह्या व्याकरणांत वेदांतील भाषेच्या व्याकरणाचा फारच थोडा विचार केला आहे.
वेवरनें पिंगल ह्या नांवाविषयीं व व्यक्तिविषयीं कांहीं माहिती दिली आहे. वृत्ताविषयक वेदांगाचा कर्ता जो पिंगल तो एक सर्प ( नाग ) म्हणजे राक्षस होता अशी एक कथा आहे. कोलब्रूकचें असें मत आहे कीं ह्यानेंच पाणिनीच्या व्याकरणावर व योगशास्त्रावर पतंजलीचें नांव घेऊन टीका केल्या. पहिल्याच श्लोकांत त्यास पिंगलनाग असें संबोधिलें आहे. ह्या पुस्तकांतल्या पहिल्या बऱ्याच ओळी नाहींत असें आपणांस दिसून येतें; तेव्हां, हा निर्देश वरील कथेस अनुलक्षूनच असला पाहिजे. पिंगल हें नांव बहुतकरून कशापासून संभवतें हेंच येथें सांगण्याचा उद्देश आहे. दंतकथेंत व इतिहासांत असलेली पिंगल व पिंगला ह्या नांवांविषयीं माहिती वेबरनें सोदाहरण दिली आहे.
ह्या ग्रंथाच्या उत्पत्तीच्या कालाची निश्चित कल्पना त्यांतील भाषेवरून व समाविष्ट विषयावरून करतां येणें शक्य आहे. यासंबंधांत वेवरनें आपल्या ' भारतविषयक अभ्यास ' नामक ग्रंथाच्या आठव्या भागांत तपशीलवार विवेचन केलें आहे. त्यानें पिंगल कोणत्या ग्रंथकारास माहीत होता त्याविषयींचे आधार दिले असून कोणत्या कालीं हा ग्रंथ लिहिला गेला ह्याविषयीं अनुमान काढण्यास योग्य अशा ह्याच ग्रंथांतील आधारांचा विचार केला आहे. तसेंच त्यानें ऋग्वेदांतील व यजुर्वेदांतील पाठ कोणत्या परिस्थितींत सध्यां आहेत ह्याविषयींहि तेथें विवेचन केलें आहे.
ह्यावरून त्यानें काढलेलें अनुमान गर्गाचार्य षड्गुरुशिष्य ह्यांच्या ग्रंथांत आलेल्या व पंचतंत्रांतल्या आधारांनीं बळावतें.
ह्या ग्रंथाचे एक ऋग्वेदांतला व दुसरा यजुर्वेदांतला असे पाठ आहेत असें वर सांगितलेंच आहे. परंतु त्यांमधील भेद लक्षांत घेण्याजोंगा नाहीं. दोन्ही ठिकाणीं दिलेलें मूळ तत्वदृष्टया खरेंच आहे किंवा नाहीं ह्याविषयीं जरी संशय असला, तरी तें स्पष्ट समजण्याजोगें आहे. याचें कारण आतांपर्यंत ह्या छोटयाशा ग्रंथांस वृत्तविषयक प्रमाणग्रंथ ह्या नात्यानें जो मान मिळतो तो होय. ह्याकरितांच त्याचें काळजीपूर्वक रक्षण केलें जाऊन सांप्रत कालीं सुध्दां तो स्पष्ट राहिला आहे.