प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
धृपदरचना.- धृपद हें ऋग्वेदामध्यें, प्रत्येक ' अतिच्छंदा ' मध्यें व ब्राह्मणामध्यें बरेच ठिकाणीं येतें. यज्ञयागादि विधींमध्यें गांभीर्य येण्याकरितां विशिष्ट पादांची पुनरावृत्ति करतात व हिलाच धृपद म्हणतात. यज्ञयागांतील पाठ म्हणण्याच्या नियमांत बरीच घुसडाघुसड झाली आहे. त्याचप्रमाणें पुनरावृत्ति, इकडचा भाग तिकडे व उलटापालट वगैरे दोषहि त्यांत आहेत. पद्याच्या अर्थाकडे किंवा संबध्दतेकडे व एकीभावाकडे मुळींच लक्ष दिलें गेलें नाहीं. धृपदाच्या पुनरावृत्तीचें विशिष्ट मूलतत्व यास्काचार्यांनी थोडक्यांत पुढीलप्रमाणें दिलें आहे. ' अभ्यास भूयांसमर्थं मन्यंते.' परुच्छेप ह्या ऋषीच्य सूक्तांतहि बरेच ठिकाणीं धृपद येतें व या परुच्छेप ऋषीची पद्धत असें म्हणतात. ऋग्वेदामधील अतिच्छंद वृत्तांतील सर्वांत जास्त म्हणजे एकंदर एकशेंअडतीसपैकीं अठयाहत्तार सूक्तें ह्याच ऋषीचीं आहेत; आणि परुच्छेप ऋषीच सूक्तांचा पृष्ठयषळह नांवाच्या विधींतल्या सहाव्या दिवशीं विनियोग आहे. या ' पृष्ठयषळहा ' मध्यें अतिच्छंद वृत्तांचाच उपयोग करतात. परुच्छेप सूक्तांत दुसरा व तिसरा पाद आणि सहावा व सातवा पद ह्यांतील शेवटच्या शब्दांपुरतीच यमकासारखी पुनरावृत्ति आढळते. व तीहि बहुतकरून दोन व जास्तींत जास्त पांच शब्दांपुरतीच आहे.
परंतु धृपदरचाना ही ऋग्वेदामध्यें अतिच्छंदापुरतीच आहे असें नाहीं. कधीं कधीं संबंध पाद तर कधीं दोन पाद असें धृपद होऊन, संबंध सूक्तांत, किंवा त्याच्या कांहीं भागांत तीं दिसतात. उदाहरणार्थ दुसऱ्या मंडलांतल्या बाराव्या सूक्तांत ' स जनास इंद्र: ' हें सुंदर धृपद प्रत्येक ऋचेंत येतें. कधीं कधीं धृपद ऋचेच्या मध्यभागीं किंवा सुरुवातीस येतें. कांहीं ठिकाणीं एक संबंध ऋचा एकामागून एक येणाऱ्या सूक्तांमध्यें धृपद म्हणून येते, आणि ह्यायोगानें ही सूक्तश्रेणि परस्परसंबध्द आहे असें कळतें.
वैदिक छंद:शास्त्राच्या वाढीमध्यें ज्या क्रिया झाल्या त्या क्रियांमध्यें अत्यंत प्राथमिक क्रिया म्हटली म्हणजे वृत्तपाद एक एक अक्षरानें वाढत जाणें, ही क्रिया होत असतांना तत्कालीन शास्त्रज्ञ तिच्यावरून नियम काढून त्या नियमांनीं वृत्तांची वाढ नियमित करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनीं अस्तित्वांत असलेलीं वृत्तें मोजून तीं नियमांनीं बांधलीं तरी नवीन वृत्तों निघण्याची क्रिया संपली नाहीं. किंवा पूर्वीचेंच निराळया वृत्तांतले मंत्र सांपडले. तेव्हां वृत्ताशास्त्रास अधिकाधिक पुरवण्या जोडाव्या लागल्या. वैदिक छंद:शास्त्राच्या अभ्यासांत या पुरवण्या वारंवार दिसून येतात.
वृत्तें सात आणि विराज् आठवें असें म्हणण्यांत कलेची अतिशास्त्रता, शास्त्राचें कलानुवर्तित्व आणि वाढलेल्या कलेचा पूर्वोक्त शास्त्रीय वाक्यांशीं मेळ घालण्याची धडपड या गोष्टी दिसून येतात. वृत्ताचें दीर्घत्व आणखी वाढलें तेव्हां अतिच्छंद ही संज्ञा तयार झाली. आणि जेव्हां ही संज्ञा पुरविण्याचा तोडगा वृत्तांची लांबी आणखी वाढून निरुपयोगी ठरला तेव्हां कृती उत्पन्न झाल्या.