प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.   

तेलगू छंद:शास्त्र- तेलगू कवि यांनी सर्व वृत्तें संस्कृत घेतलीं आहेत. पण विशेषत:ते संस्कृत वृत्तांपैकीं शार्दुल विक्रीडित,मत्तेभविक्रीडित, उत्पकमाला व चंपकमाला हीं चार वृत्तें वापरतात. संस्कृत वृत्तें जरी घेतलीं आहेत.तरी त्यांत तेलगू कवितेस अंत्य यमकांची शृंखळा नाहीं.तेलंगी पद्यांच्या चारी चरणांस प्रास पाहिजे,व प्रत्येक चरणास यति पाहिजे. म्हणजे श्र्लोकाच्या चारहि चरणांचें द्वितीयाक्षर एकच व्यंजन पाहिजे.स्वरभेद असल्यास चिंता नाहीं. पहिल्या चरणाचें दुसरें अक्षर जर 'क' असेल तर बाकीच्या चरणांचे द्वितीयाक्षर कच्चा बाराखडीतलेंच पाहिजे;दुसरें कोणतेहि द्वितीयाक्षर जोडाक्षर असेल तर बाकीच्या चरणांचीं द्वितीयाक्षरे त्याच जोडाक्षरांच्या बाराखडींतल्यापैकीं पाहिजेत. यति म्हणजे विश्रामस्थान-चरण वाचतांना थांबवण्याची जागा. पण तेलगू यतीचा असा नियम आहे की, थांबून पुन: ज्या अक्षरापासून वाचायला सुरूवात करावयाची तें अक्षर व चरणाचें पहिलें अक्षर समोच्चरणाचीं [सारख्या उच्चारांचीं] पाहिजेत पण दोन्ही ठिकाणी प्रासाप्रमाणें एकच अक्षर पाहिजे असा कडक नियम नाहीं. कित्येक अक्षरांकरितां दुसरीं कित्येक अक्षरें यतिस्थानी राहूं शकतात व अशा अक्षरांत यति-मैत्री आहे असे म्हणतात. उदाहरणार्थ, च, छ, ज, झ, श, ष, व स या अक्षरांत यतिमैत्री आहे. प्रत्यके वर्गाच्या पहिल्या चार अक्षरांत परस्पर यतिमैत्री आहे. असेच इतर तेलगू छंद:शास्त्राविषयी बरेच बारीक नियम आहेत.

आतांपर्यंत वैदिक व वेदाकालीन लौकिक प्रवृत्तीपासून जें छंद:शास्त्र निर्माण झालें त्याचा  विकास सांगितला. आतां आपण आपली द्दष्टि जरा व्यापक करून संस्कृतोद्धव छंदशास्त्र आणि इतर भाषांतील छंद:शास्त्र यांच्या तुलनेस लागूं. संस्कृतोद्धव छंदशास्त्र, द्राविड छंदशास्त्र, आणि पाश्र्चात्यांचें छंद:शास्त्र यांच्यामध्ये कोण कोणतें साद्दश्य आणि विसाद्दश्यआहे तिकडे आतां वळूं. वृत्तें नवीन नवीन रचणें हें निराळें आणि साधारण म्हणण्यांतलें वृत्त घेऊन त्याची शास्त्रीय पद्धति बसविणें हे निराळें. वृत्त हें भाषेशीं फक्त काहीं अंशी संलग्न असतें पूर्णाशानें नसतें. मराठीत आघातांवर वृत्तरचना करावयाची झाल्यास ती अशक्य नाहीं. लघुगुरूत्वावर इंग्रजींत वृत्तरचना करणें अशक्य नाहीं पण असें होण्यास ती भाषा वापरणारांच्या कानास निरनिराळया प्रकारच्या वृत्तपद्धति ऐकण्याची संवय उत्पन्न करावी लागते. संस्कृत वृत्तपद्धति तामिळ भाषेस रूचली नाहीं. पण तेलूगूस रुचली आणि तिचा यवद्वीपांत देखील प्रसार झाला.

निरनिराळया छंद:शास्त्रांची तुलना करावयाची म्हणजे प्रत्येक भाषेंतील कवितेच्या गणांचे स्पष्टीकरण करावयाचें.