प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
तीन स्वरांचे अवगमन.– अशी शक्यता आहे की सात स्वरांत संगीत सृष्टीची विभागणी करण्यापूर्वी तीन स्वरांतच प्राचीन शास्त्रज्ञांनी विभागणी केली असावी.
ॠग्वेद पठनात उदात्त, अनुदात्त आणि स्वरित हे तीन स्वर वापरावे असा शिक्षाग्रंथाचा नियम आहे. या तीन स्वरांची किंमत सात स्वरांइतकी आहे अशा तऱ्हेची माहितीहि पुष्कळ ठिकाणी सांपडते. तथापि यावरुन असें समजूं नये की, हौत्र म्हणणारी मंडळी ॠग्वेदाच्या तीन स्वरांत – म्हणजे खरोखर सात स्वरांत गात होती. ती सात स्वरांत गात नव्हती किंवा तीन स्वरांतहि गात नव्हती. हौत्र मंत्र नेहमी स्वरहीन म्हणत असत व म्हणतात. याविषयी विधिवाक्य ऐतरेय ब्राह्मणांत आढळून येत नाही, पण सूत्रग्रंथात आहे ( एकश्रुति संततं अनुब्रूयात् पर:संनिकर्ष: ऐकश्रुत्यम-आश्वलायन श्रौत सूत्र १.१,१ ). हौत्र मंत्र सात स्वरांत म्हणत असते तर उद्गांत्यांची जरुरच नव्हती. हौत्रांत जर स्वरयुक्त मंत्र म्हटले जात नव्हते तर ॠग्वेदपठनांत स्वरांचें प्रयोजन काय ? आणि ॠग्वेद्यांनी आपले ग्रंथ उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या तीन प्रकारच्या उच्चारांनी म्हणावे म्हणून नियम तरी कशाला केला ? यावर दोन कल्पना निघतात. एक कल्पना म्हटली म्हणजे ज्याप्रमाणे मुलें परवचा म्हणावयाचा तो स्वरयुक्त म्हणतात त्याप्रमाणें हौत्र मंत्र पाठ करतानां विद्यार्थी स्वरयुक्त म्हणत असतील आणि त्यास पुढें कांही तरी पद्धति लागावी म्हणून उदात्त, अनुदात्त आणि स्वरित ही योजना झाली असेल. दुसरी कल्पना म्हटली म्हणजे आपला वेद गायनयुक्त करुन उद्गात्यांचा वर्ग अनवश्यक करावा असा होत्यांचा प्रयत्न असेल. काहींहि असो. ही स्वरयुक्त ॠग्वेद म्हणण्याची योजना टिकली मात्र नाही. आज ॠग्मंत्र म्हणतात ते अगदीं निराळया तऱ्हेने म्हणतात. जेथें खाली खूण असेल तेथें डोकें खाली करतात, आणि जेथें वर खूण असेल तेथें डोके वर करतात म्हणजे याखेरीज स्वरांना कांही अर्थ आहे असें ते समजतच नाहीत. असे करण्यात फार चूक होते असेंहि नाही. आमच्या मते ॠग्वेदांतील स्वरांनां फारशी किंमतच नाही. जे स्वर ग्रंथी लिहिले आहेत त्यांस श्रौत महत्व कांहीच नाही व व्याकरणमहत्वहि नाही. दधीचि ॠषीची इंद्रशत्रुविषयक कथा ब्राह्मणांत दिली आहे. ती व्याकरणेतिहासमहत्वाची मुळींच नाही असें तरी म्हणावें लागेल; किंवा आश्वलायन सूत्राचा आदेश उत्पन्न होण्यापूर्वी फार थोडा काळ स्वरयुक्त म्हणणें होत असेल आणि तें म्हणणें कायम करण्याकरितां तो अर्थवाद उत्पन्न झाला होता असें म्हणावें लागेल. वैयाकरणांनी बहुव्रीहि आणि तत्पुरुष समास उच्चारावरुन ओळखले जावे आणि त्यामुळें कांही निश्चित उच्चारयोजना व्हावी म्हणून वरील अर्थवाद उत्पन्न करुन धडपड केली होती एवढेच त्यावरुन निघते.
अथर्ववेद्यांची विद्या आपल्या वेदांत किंवा सूत्रग्रंथांत घेऊन त्यांचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न ॠग्वेद्यांनी केला. त्याचप्रमाणें जर सामवेदी मंडळीचें उच्चाटन करण्याचा प्रयत्न ॠग्वेद्यांनी केला असेल आणि त्यासाठी गाणे म्हणण्याची कला आणि तदनुषंगी शास्त्र हे जर ॠग्वेद्यांनी घेतलें असेल, तर सामवेद्यांची प्राचीन पद्धति तीन स्वरांचीच होती असें होईल. याचा अर्थ असा कीं, गाण्यांत सात स्वर ओळखावयास यावयाच्या पूर्वी तत्कालीन गायनपंडितांस तीन स्वरच ओळखले गेले.
यावरुन सामगायनांतील स्वरसप्तक म्हणजे लौकिक गायनांतील `म, ग, रे, सा, ध, नी, प’अशा स्वरक्रमाचें असल्याचें दिसून येते. आतां ह्या क्रमामध्ये अशी एक शंका उद्भवते कीं, षड्जा [सा] नंतर अवरोहक्रमाप्रमाणे निषाद [नी] हा स्वर यावयास पाहिजे तो न येतां धैवत [ध] कसा आला ? व शेवटचा `पंचम’ [प] हा स्वर अवरोहक्रमानुसार धैवताच्या खालचा आहे असें मानल्यास येथेंच सात स्वर समाप्त होतात; मग `क्रुष्ट’ [सर्वांत उच्च] स्वराची वाट काय ? परंतु या शंकेचें समाधान अशा रीतीने करतां येण्याजोगें आहे कीं, सामगायनाच्या पुस्तकांतून जी स्वरलेखन पद्धति आढळते तिजमध्ये `क्रुष्ट’ स्वराकरिता ७ हा आकडा येतो. हा स्वर सामगायनांत क्वचित वापरला जात असल्यामुळें त्या स्वरास शेवटी टाकलें असावें. पण वस्तुत: `क्रुष्ट’ स्वर हा सर्वांपेक्षा उच्च असल्यामुळें तोच पहिला स्वर होय. आता धैवत हा स्वर निषादापूर्वी येण्याचे कारण असें दिसतें की, त्या वेळी निषादालाच `धैवत’ हे नांव असावें व निषाद हे नांव धैवतास असावें. कसेहि असो, या स्वरांच्या घोटाळयासंबंधानें समाधानकारक असा निर्णय लावण्याची पंचाईत पडते.
लौकिक गायनांत षड्ज, ॠषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे सात स्वर गाइले जातात ही गोष्ट सर्वांनां परिचित आहे. सा, री, ग, म, प, ध व नि ह्या षड्जादि स्वरांच्याच नामसंकोचनाने बनविलेल्या संज्ञा होत. लौकिक गायन हें सामवेदांतूनच निर्माण झाले अशी समजूत आहे. लौकिक गायनांत वापरल्या जाणाऱ्या स्वरांचाहि उद्भव सामवेदांत असावा हे शक्य आहे.