प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
त्यागराज- याप्रमाणें उत्तर हिदुस्थानांतील संगीतपद्धतीहि नव्या तत्वावर वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करीत होती. त्या वेळीं दक्षिणेंत नवीं नवीं पद्ये रचण्याचें काम पुढें चालू होतें. तंजावर हें हिंदुस्थानांतील  संगीतकलेचें एक प्रमुख ठिकाण होतें. येथेंच त्यागय्या अथवा त्यागरात (१८०० ते १८५०) या विख्यात गवई व कवीनें अनेक पद्यें स्वत: रचून ती हाणून दाखविण्याचा क्रम चालविला होता. त्यामुळें त्याच्या जवळ शिष्यवर्गही बराच जमला; व या शिष्यांनी त्याची पद्धति अद्याप चालू ठेविली आहे. त्यानें केलेलीं सुदंर कृती व कीर्तंने अद्यापही दक्षिणेंत सर्वत्र गाइलीं जातात. तो स्वत: उत्तम दर्जाची पद्यें रचीत असे;  आणि या त्याच्या पद्यांनी दक्षिण हिदुस्थानांतील संगीताच्या प्रगतीला चांगली मदत केली. हा त्यागय्या चांगला उंच सडपातळ आणि वर्णानें निमगोरा असा इसम होता, असें त्याला प्रत्यक्ष पाहिलेले लोक सांगतात. त्याचा स्वभावहि पूर्ण निस्वार्थी व प्रामाणिक होता. त्याला लोकांत चांगला मान मिळत असे त्याचा बाप रामब्राम्हण हाहि साधारण बरीं पद्ये रचीत असे. अशी दंतं कथा आहे कीं, नारद ऋषींनी स्वत:येऊन त्यागराजाला स्वरार्णव नांवाचा ग्रंथ दिला. याचा गुरू संथी वेंकट रामन् हा होता धार्मिक बुध्दि आणि संगीताची आवड ही दोन्ही त्याच्या ठिकाणी वास करीत असल्यामुळें त्याचीं पद्यें पुर्ण भक्तिरसमय असत. हीं पद्यें तो एकादशीच्या दिवशींच सर्व दिवस उपोषण करून रचीत असें म्हणतात. त्यागराजानें संगीती म्हणून एक पद्यांचा नवा प्रकार सुरू केला. मूळ रागांत काही विषेश फरक करून ही पद्यें तयार केलेली असत. हया नव्या भिन्न पद्यांत मूळ रागाची महत्वाची लक्षणें कायम ठेऊन त्यांत कांही नव्या नव्या सधारणा केलेल्या असत. या सर्व पद्यांत नवीनपणा हा प्रमुख गुण होता.