प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

तानसेनाच्या अनुयायांचे दोन वर्ग-रवावियर व वीनकार.– तानसेनाच्या अनुयायांचे पुढें दोन वर्ग पडले.  एक वर्ग रवावियर यांचा व दुसरा वर्ग वीनकार यांचा.  यांपैकीं पहिल्या वर्गाने तानसेनानें नवीन तयार केलेलें “रवाव” नांवाचे वाद्य प्रचलित केले आणि दुसरा वर्ग वीणा उर्फ वीन या वाद्याचा उपयोग करीत असे.  या दोन्ही पंथाचे अनुयायी आजहि रामपूर येथें अस्तित्वांत आहेत.  रामपूर हे संस्थानहि बरीच शतकें उत्तम संगीतज्ञांबद्दल प्रसिद्ध आहें.  वीनकार पंथाचा आजचा प्रतिनिधि महंमद वजीरखान हा असून त्याचा एक पूर्वज नवीखान वीनकार महमदशहा बादशहाच्या पदरी होता.  महमद अल्लाखान हा रवावियर पंथाचा आजचा प्रतिनिधि आहे.  उदेपूर घराण्यांतील राजाची बायको साध्वी मिराबाई ही सुप्रसिद्ध कवयत्री व संगीतज्ञ होती.  मिराबाईविषयीं एक बाष्कळ कथा प्रचलित आहे.  तिला कुंभाची बायको म्हणजे राणा संगाची आजी समजतात आणि तिचें गायन अकबरास ऐकवितात.  ही मिराबाई आणि हिंदी रामायणाचा कर्ता तुळसीदास हे उत्तर हिंदुस्थानांतील संगीताच्या ज्ञानाचे प्रतिनिधी होते.