प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
तानसेन.–दिल्लीचा बादशहा अकबर हा संगीताचा मोठा शोकी होता आणि त्याच्या प्रगतीकरतां त्यानें पुष्कळ प्रयत्नहि केले. त्याच्या कारकीर्दीत बाह्य संगीताचा परिणाम होऊन देशी रागांमध्ये बरेच फेरफार झाले. यांपैकी कांही फेरफारांमुळे प्रचलित पद्धतीत बरेंच अतिक्रमणं झाले. तरी एकंदरीत यामुळें उत्तर हिंदुस्थानांतील संगीत पद्धतीचा बराच फायदा झाला आणि तिच्यांत आल्हाददायक अशा कांही नव्या गोष्टी शिरल्या. दरबारी संगीत म्हणून ज्याला म्हणतात तें अकबराच्या कारकीर्दीतच सुरु झालें आणि देवालयांतील व नाटयांतील संगीताबरोबरच याचीहि वाढ झाली. अकबर बादशहाच्या कारकीर्दीत यमुना नदीच्या कांठच्या वृंदावन या श्रीकृष्णपंथी लोकांच्या प्रमुख क्षेत्रात हरिदास स्वामी या नांवाचा एक महान हिंदु साधु आणि संगीतज्ञ राहात असे. तो तत्कालीन संगीतज्ञांपैकी सर्वांत श्रेष्ठ म्हणून गणला जात असे. अकबराच्या दरबारांतला सुप्रसिद्ध गवई तानसेन ह्याच्या शिष्यवर्गापैंकी होता. या तानसेनाचा लौकिक हिंदुस्थानांत चोहोंकडे ऐकूं येतो व त्याच्या संबंधी बऱ्याच मनोरंजक गोष्टी प्रचलित आहेत. तानसेनासारखा गवई हजार वर्षांतहि झाला नाहीं असे म्हणतात. तानसेनासंबंधाची एक गोष्ट अशी सांगतात की, एके दिवशीं बादशहानें त्याचें गाणें ऐकल्यावर त्यास विचारलें “तुझ्यासारखा गवई साऱ्या जगांत तरी मिळेल काय ?” त्यावर तानसेनानें उत्तर दिले “माझ्यापेक्षां फारच वरचढ असा एक गवई आहे.” तेव्हां बादशहाने त्याचें गाणें ऐकण्याची अत्यंत उत्कंठा प्रदर्शित केली. तेव्हां त्याला असे सांगण्यात आलें कीं दरबारांत येण्याबद्दल खुद्द बादशहाचा हुकुम झाला तरी तो मानणार नाहीं. तेव्हां अकबरानें नाइलाजास्तव स्वत:च त्याचकडे जाण्याचे ठरविलें आणि तानसेनाच्या एका हलक्या वाद्यवाहकाचा पोषाख करुन बादशहा त्याचेकडे गेला. हरिदासस्वामीच्या यमुना नदीच्या कांठावर असलेल्या मठांत आल्यावर तानसेनाने आपल्या गुरुस गाण्याबद्दल विनंति केली; परंतु ते त्यानें साफ नाकारलें. तेव्हां तानसेनानें एक युक्ति योजिली. ती ही की, त्याने आपल्या गुरुसमोर स्वत: गावयास सुरुवात केली आणि गातांना मुद्दामच कांही चूक केली. त्याबरोबर त्या चुकीकडे त्याच्या गुरुचें लक्ष जाऊन त्याने ते गीत बरोबर म्हणून दाखविलें. अशा रीतीने आरंभ झाल्यावर त्यानें पुढें इतके बहारीचें गायन केलें की, बादशहा अगदीं तल्लीन होऊन गेला. नंतर तेथून परत राजवाडयाकडे जात असतां बादशहा तानसेनास म्हणाला, “तुला असे कां गातां येत नाहीं !” तेव्हां तानसेनानें उत्तर दिलें, मला सरकार जेव्हां आज्ञा करतात तेव्हां गावें लागतें व माझे गुरुजी त्यांनां अंत:स्फूर्ति होईल तेव्हांच गातात, त्यामुळे असा फरक पडतो.”
अकबराच्या दरबारांतील मंत्री ग्वाल्हेरचा राजा मानसिंग हाहि संगीताचा मोठा आश्रयदाता होता. ध्रुपदाची पद्धति त्यानेच प्रचारांत आणली असें म्हणतात. ग्वाल्हेर दरबाराची ही संगीताबद्दलची ख्याति अद्यापहि चालू आहे.