प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

जयदेव व त्याचें गीतगोविंद.- ज्याचें स्थळ आणि काळ यांबद्दल निश्चित माहिती आपणांस आहे असा उत्तर हिंदुस्थानांतला पहिला संगीतज्ञ जयदेव हा होय.  तो १२ व्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला.  याचा जन्म बोलपूर नजीक केंडुला या गांवी झाला.  बोलपूर म्हणजे बंगाल आणि अर्वाचीन हिंदुस्थान यांचे कविशिरोमणि जे रवींद्रनाथ टागोर त्यांचे हल्लींचे  निवासस्थान होय.  केंडुल येथे अजूनहि दरसाल यात्रा भरत असते व तेथें त्या प्रसंगी उत्तमोत्तम पद्ये गाइलीं जातात.  जयदेवानें गतिगोविंद या नांवाचा ग्रंथ रचिला व त्यांतील पद्यें तो स्वत: गाऊन दाखवीत असे.  या पद्यांमध्ये श्रीकृष्णलीलांचे वर्णन आहे त्यामुळें ही पद्ये भत्तिमार्गाचा प्रसार करणाऱ्या हिंदुस्थानांतील अनेक गवयांच्या तोंडून ऐकावयास मिळतात.  या ग्रंथातील प्रत्येक पद्यावर राग व ताल यांची नांवे दिलेली आहेत, तथापि त्यांचा बोध आजच्या हिंदुस्थानांतील संगीतज्ञांस होत नाही.  त्यावेळी या पद्यांना प्रबंध असे म्हणत असत.

गीतगोविंद ग्रंथातील पद्यरचना फारच मनोहर आहे.  ही गोष्ट सर एडिवन अर्नोल्ड यांनी केलेल्या त्याच्या इंग्रजी भाषांतरावरुन ( दि इंडियन साँग ऑफ साँग्ज ) यूरोपीयांस परिचित झाली आहे.  या पद्यांत राधेने श्रीकृष्णाचा धांवा केलेला असून तिंने त्यांत आपली सुखदु:खे निवेदन केलेलीं आहेत आणि उलट श्रीकृष्णानें तिला आपल्या प्रेमाबद्दल आश्वासन दिलेले आहे.