प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.   
 
छंदःशास्त्राच्या इतिहासलेखनांतील क्रिया.- छंद:- शास्त्राचा इतिहास घ्यावयाचा म्हणजे दोन क्रिया कराव्या लागतील. ( १ )  छंदःशास्त्राचें साहित्य जीं निरनिराळ्या प्रकारचीं वृत्तें तीं तपासावयाची; आणि (२) त्यांच्या साहाय्यानें भारतीयांचे छंदोज्ञान तपासावयाचें. पहिली क्रिया केली म्हणजे आपणांस भारतीयांच्या छंदोरचनाकौशल्याचें ज्ञान होईल व दुसरी क्रिया केली म्हणजे त्यांच्या शास्त्ररचनेच्या प्रयत्नांचा हिशेब घेतल्यासारखें होईल. ह्या दोनहि क्रिया आपणांस कर्तव्य आहेत. वृत्तविकास, वृत्तरुपांत्तर, आघातवृत्त, अक्षरवृत्त, परकीय वृत्तशास्त्राचा परिणाम इत्यादि विषयांचे विवेचन छंदःशास्त्राच्या इतिहासांत आलें पाहिजे.

आजचे छंदःशास्त्र वेतलें तर त्यांत अनेक वृत्तें दिसुन येतात. त्यांत गुरुलघुकल्पना व मात्रा इत्यादि गोष्टी आहेत, अक्षरगण आहेत, मात्रागण आहेत व यती आहेत. पदें वगैरे घेतली तर त्यांतहि पालुपद आहे व निरनिराळ्या चाली आहेत. या सर्व गोष्टी अगदी प्राचीन काळी अवगत होत्या काय? प्राचीनांनी कविता बरोबर केली एवढयावरुन प्राचीनांस कवितेचे नियम पद्धतशीर अवगत होते असे म्हणतां येत नाही, कां कीं, पद्धतशीर पदे लिहिणा-या अनेकांना मात्राज्ञानहि ऩसतें. तर आपणास हे पाहिले पाहिजे की पद्याची शास्त्रीय विभागणी व तपासणी, अक्षरांची आणि मात्रांची मोजदाद इत्यादि गोष्टी आपल्या पूर्वजांनां कशा कशा अवगत झाल्या.

वेदकाल, पासून आजपर्येतचा जो वृत्तोदधि त्याच्या शास्त्रीय अभ्यासांत खालील मुद्दे विचारासाठी घेतले पाहिजेत.

(१)वेदकालीन वृत्तें व त्यांचा वेदकालांतीलच विकास.

(२)वेदकालांत अशीं कांही वृत्तें होती काय, कीं जीं आज ग्रंथी द्दष्ट होत नाहीत परंतु त्यांचे अस्तित्व आपणांस उत्तरकालीन वृत्तांच्या अस्तित्वावरुन विकासनियमांनी काढतां येईल.

(३)वेदकालीन वृत्तांवरुन उत्तरकालीन कवींच्या ग्रंथांत वापरली जाणारी वृत्तें कितपत काढतां येतात.

(४)जीं वृत्तें आपणांस मराठी वगैरे प्राकृत कवितेंत आढळतात त्यांची परंपरा आपणांस वेदकालापर्यंत भिङविता येईल काय.

ही मूलरुपविकासाची गोष्ट झाली; पण तेवढ्यानें वृत्तेतिहास संपत नाहीं.

छंदांच्या इतिहासाची संगति आपणांस जुळवावयाची म्हणजे आपणांस वैदिक वाङ्मयापासून सुरुवात करुन आजची पदें आणि लावण्या यांच्या विकासापर्यंत इतिहास आणून सोङावयाचा. या इतिहासांत आपणांस दोनच क्रिया पहाव्या लागतील. एक क्रिया म्हटली म्हणजे पूर्वमूलक विकास आणि दुसरी क्रिया म्हणजे परकीय संस्कार. परकीय संस्कार आपणांस दोनच काल घेऊन तपासावयाचा आहे. मुसुलमान राष्ट्रांशी संगतीचा काल आणि यूरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाचे काल. या दोन कालांत परकीय संस्कार जे झाले ते मोजले म्हणजे फक्त देश्य विकास पहावयाचें बाकी राहतें. हा विकास तपासावयाचे साहित्य देखील अनेक भाषांत विखुरलेलें आहे. वैदिक वाङ्मयांतर्गत वृत्तें, महाराष्ट्रीसारख्या वाङ्मयांतील वृत्तें, संस्कृत पद्धतशीर अक्षरगणात्मक आणि मात्रागणात्मक वृत्तें आणि आजच्या मराठी  व इतर देशी भाषांतील पदांत दृग्गोचर होणारे छंद या सर्व प्रकारच्या साहित्याचा अभ्यास करुन तो इतिहास काढावयाचा आहे. आजचीं पदें काय आणि स्वराघातविहीन पाणिनीय संस्कृत वाङ्मयांतील छंद काय, त्यांचे स्वरुप एका दृष्टीनें सारखें आहे. अक्षरगण आणि मात्रागण लक्षांत घेऊन वृत्ताची शुद्धता या दीर्घकालांत पहावी लागते. मंत्ररचनाकालांत अक्षरगणवृत्तें आणि मात्रागणवृत्तें यांऐवजी आघातलक्षी वृत्तें असणें शक्य आहे. जर तीं अशी असली तर भाषा निराघात होऊन त्याबरोबर छंदोरचनेंत फेरबदल झाला असें होईल.

प्राचीनांचे वृत्तज्ञान समजून घेताना प्रथम ऋग्वेदांत असलेली वृत्तें पहाणें हे आपलें काम आहे. तसेंच कोणत्या वृत्तांची नांवे वेदांत आली आहेत हेंहि आपणांस पाहिले पाहिजे. वृत्तांस नांवे दिली म्हणजे पद्धतशीर शास्त्ररचनेस थोङीबहुत सुरुवात झाली असें म्हणतां येईल.