प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.           
 
छंद:सूत्राची भाषा:- मागाहून जोडलेल्या प्रस्तावनेशिवाय ह्यांतील बाकीचा भाग गद्य आहे ही गोष्ट महत्तवाची असून ह्या वरून सूत्रवाड्मयाचा समकालीन हा ग्रंथ असावा असें कळतें. थोंडक्यांत विचार प्रकट करण्याची इच्छा व उत्तरकालीन वाडमयांतल्या ह्या भागाची महत्वाची खूण ' शब्दस्वल्पता, ' असे दोन ह्या ग्रंथांतील लेखनपध्दतीचे विशेष आहेत. कांहीं कांहीं ठिकाणीं तर अवश्यक भाग सर्वचे सर्व गाळल्यानें अर्थहीन झालेले नियम कोडयांप्रमाणें गूढ होतात व परंपरागत आलेलें त्यांचें स्पष्टीकरण वाचल्याशिवाय गाळलेले भाग कोणते आहेत हें कळणें दुरापास्त होतें. पाणिनीच्या सूत्रांप्रमाणेंच ही सूत्रबध्दपध्दति कठिण आहे. ह्या ग्रंथांत आलेल्या व्याकरणांतील रूपांवरून सुध्दां सूत्रवाडमयाचा व ह्याचा संबंध होता असें दिसून येतें.

शब्दविषयक भागासंबंधानें विचार करतांना आपण  फक्त शब्दाच्या रचनेकडे लक्ष देऊं. कारण शब्दाच्या अर्थाकडे लक्ष दिल्यास आपण आपला दुसरा मुद्दा जो  ग्रंथातर्गत विषयापासून कालनिर्णयासंबंधानें निघणारे आधार ' तो हातांत घेतल्यासारखा होईल. छंद:सूत्राच्या शब्दसंग्रहांत विशेष प्रामुख्यानें दिसून येणारी गोष्ट म्हटली म्हणजे तीन अक्षरांच्या पादांच्या वृत्तांस दिलेलीं पारिभाषिक नांवें ही होय व त्यायोगानेंच पिंगलाचार्यांची सर्व पध्दति नियमित केली आहे. पिंगलाचार्यांनीं स्वत:च हीं नांवें निर्माण केलीं किंवा त्यांनां हीं अशींच कोठें तरी सांपडलीं हें नक्की सांगतां येत नाहीं.

विवक्षित संख्यादर्शक पदार्थांच्या नांवांची, अक्षरसंख्या  दाखविण्यासाठीं शब्दांक म्हणून योजना पिंगलाचार्यांच्या शब्दसंग्रहांत आढळते हा आणखी एक त्यांच्या ग्रंथाचा विशेष आहे.  येथेंच प्रथमत: चार महासागर, पंचमहाभूतें, षड्रस असल्या शब्दांचें कालनिर्णयाच्या दृष्टीनें महत्व दिसून येतें. तथापि ह्या  शब्दांचें महत्व त्यांच्या उल्लेखांपेक्षां अनुल्लेखांतच वेवरला जास्त वाटतें. कारण हे अनुल्लिखित शब्द ज्या ज्या ग्रंथांत  शब्दांकयोजनेची पद्धत अंगीकारलेली आहे त्या त्या ग्रंथांत आढळून येतात. उदाहरणार्थ, अग्निपुराणामध्यें छंदांची  वृत्तविषयक मांडणी करतांना शर म्हणजे पांच ( कामदेवाचे पांच बाण ), ग्रह म्हणजे नऊ ( नवग्रह ), नाग म्हणजे आठ ( आठ दिग्गज ), असे उल्लेख आले आहेत. यावरून ह्या शब्दांसंबंधींच्या संख्यांकबोधक कल्पना पिंगलाचार्यांचा ग्रंथ रचला गेला तेव्हां रूढ झाल्या होत्या असें दिसून येत नाहीं.  उलट पक्षीं, पिंगलाचार्यांनीं वापरलेले पुष्कळ शब्द अलीकडले आहेत असें वेवरनें त्यांचीं कांहीं उदाहरणें देऊन स्पष्ट दाखविलें आहे.

सप्तस्वरांचीं नांवें सर्व हिंदुस्थानांतील वाडमयांत येथें प्रथमच आपणांस सांपडतात. बीजगणितांतले कांहीं पारिभाषिक शब्दहि या ग्रंथांत आले आहेत.

आतां आपण ह्या ग्रंथाच्या कालनिर्णयासंबंधानें तदंतर्गत विषयांतून मिळणाऱ्या आधारांचा विचार करूं.

यासंबंधी पहिला आधार म्हटला म्हणजे ज्यांचा पिंगलाचार्यांनीं नामनिर्देश केला आहे असे आचार्य होत. ह्यांचीं नांवें फारच पुरातन आहेत. क्रौष्टुकी, यास्क, तांडिन् वगैरे नांवें वेदकालीन वृत्तांचा विचार ज्याच्यांत केला आहे अशा तिसऱ्या अध्यायांत येतात. हीं सर्व वेदांतील प्राचीन कालचीं नांवें होत. तांडिन् ह्या नांवानें सामवेदांतील तांडिन् शाखेचा म्हणजे पंचविंशब्राह्मणांतील तांडय शाखेचाच निर्देश केला असावा, यास्क ह्या नावानें पुढें प्रसिध्दीस आलेला व  निरुक्ताचा कर्ता जो यास्क त्याच्याच निर्देश केला असावा व क्रौष्टुकी या नांवाचा ग्रंथकार यास्काच्या पुस्तकांत आलेला  वैयाकरण असावा. आणि जर तिसरा अध्याय हा इतर अध्यायांपेक्षां जुना आहे असें धरलें, तर पिंगलाचार्यांनीं स्वत: हा भाग लिहिला असें ठरतें. इतर भागांमध्यें आलेलीं
काश्यप, सैतव, रात, मांडूक्य वगैरे आचार्यांची नांवें हीं उत्तारकालीन ग्रंथांत सांपडतात तरी ते पुरुष वेदकालीन खास होते. प्राच्यवृत्तिा व उदीच्यवृत्तिा ह्या नांवांच्या दोन वृत्तांवरून प्राच्य भाषा व उदीच भाषा असा भाषाभेद त्या काळीं मानला जात होता असें दिसतें ही  विभागणी पाणिनीमध्येंहि आढळते. ह्यावरून हिंदुस्थानांतील प्राच्य व उदीच्य भाग हे एकाच देशाचे अंश आहेत अशीं त्या काळीं सुध्दां लोकांनां जाणीव होती हें स्पष्ट होतें.

पिंगलाचार्यांच्या वृत्तानामांत विपुल विषयवृध्दि दिसून येते. पिंगलाचार्यांनीं दिलेल्या सुमारें ६० लौकिक वृत्तांमध्यें  बऱ्याच मोठया दजाचें शृंगारात्मक व भावात्मक काव्य आढळून येतें.

ह्या वृत्तांपैकीं बरींच वृत्तों ललनांच्या प्रेममय गुणविशेषांवर रचलेलीं आहेत व कांहीं स्त्रियांचें स्वरूप व सौंदर्य ह्यांवरहि रचलीं आहेत. यांतील कांहीं वृत्तांचीं नांवें त्या त्या वृत्तांच्या रचनेच्या पध्दतींचीं निदर्शक आहेत.

परंतु जेथें अशी स्थिति नाहीं अशीं कांहीं वृत्तानामें आहेत.  यापैकीं कांहीं पद्यांतूत उसनीं घेतलीं असावींत व हीं पद्यें त्या विशिष्ट वृत्तांत लिहिलेलीं असून त्यांमध्यें या शब्दांस बरेंच महत्वाचें स्थान असावें. हीं पद्यें हें या वृत्तानामांचें उत्पत्तिस्थान होतें असें दिसतें. बहुतकरून हीं वृतें ह्या पद्यांच्या अगोदर एकतर अस्तित्वांत नव्हतीं व ह्या पद्यकारांनीं  तीं प्रथमच लिहिलीं असावींत; किंवा पूर्वी तीं अन्य नांवांखालीं मोडत असावींत; ज्या पद्यांत ह्या वृत्तांचीं नांवें येतात त्यांतूनच हीं नांवें घेतलीं होतीं असें गृहीत धरून चालणें अत्यंत  महत्वाचें आहे. असें असण्याचा संभव आपणांस एकदम खोडून काढतां येणार नाहीं. तथापि असें म्हणतांना आपणांस प्रत्येक विशिष्ट उदाहरण तपासून पहावयांस पाहिजे. कारण, ज्यांत त्या त्या वृत्तांचीं नावें आहेत अशीं हीं पद्यें अगदी अलीकडचीं असण्याचा संभव आहे. कदाचित् ज्यानें हीं उदाहरणें दिलीं आहेत त्यानेंच तीं स्वत: तयार केलीं असतील.

ऑफ्रेक्टनें दिलेल्या उदाहरणांवरून आपणांस त्या कालीं विधिविषयक काव्याच्या बरोबरच कांहीं लौकिक, शृंगारात्मक व भावात्मक काव्यांचा सुध्दां अभ्यास सूत्रग्रंथाचा अभ्यास करणाऱ्याकडून होत असे असा पुरावा मिळतो. शार्ङ्ग धराच्या पध्दतींतून उध्दृत केलेले व वात्स्यायनाच्या कामसूत्रामधून घेतलेल्या गोनर्दीय व गोणिकापुत्र ह्यांच्या संबंधीं केलेल्या  विधानांत असलेले, पाणिनीचे वंशस्थ व शिखरीणी वृत्तांतले शृंगारात्मक काव्याचे श्लोक ऑफ्रेक्टनें दिले आहेत. परंतु पिंगलानें केलेल्या वाङमयाच्या ह्या अंगाच्या निर्देशावरून तो कमी प्राचीन होता असें सिध्द  होत नाहीं.

ज्या ठिकाणीं वृत्ताचा अर्थ आणि त्याची रचना ह्यांचा संबंध येऊन वृत्त तयार होतें अशीं पुष्कळच वृत्तें आहेत. प्राण्यांचा आवाज किंवा त्यांच्या संवयी ह्यांचें अनुकरण कांहीं वृत्तांत असून पुष्कळ ठिकाणीं वृत्तांचीं त्यावरूनच नांवें ठरलीं आहेत. कांहीं नांवें वनस्पतिकोटींतून घेतलीं आहेत.

कांहीं नांवें देव आणि असुर ह्यांच्या नांवांपासून घेतलीं आहेत. पुढें वीररसकाव्यामध्यें येणाऱ्या वृत्ताचें श्लोक हें  नांव अजून आढळत नाहीं. येथें त्याला वक्त्रम् म्हणजे मुख असें म्हटलें आहे. छंद:सूत्राच्या कालनिर्णयाला पोषक असे त्या ग्रंथांतील भाषेच्या शब्दसंग्रहाचे आधार एवढे बस आहेत.

आतां आपण ज्या कालापाशीं आलों आहों त्या कालास स्थूलमानानें वैदिक सूत्रवाडमयाच्या शाखाविस्ताराचा म्हणजे ज्योति:शास्त्र व बीजगणित एतद्विषयक वाङमयांच्या प्रारंभाचा  काळ म्हणतां येईल. ह्या कालाची अधिक निश्चयात्मक व्याख्या देतां येत नाहीं.

वेदकालीन वृत्तांचें अक्षरांची संख्या हें मूलतत्व आहे. निदानसूत्रांतील उपांत्याच्या नियमांत व ऋक्प्रातिशाख्यांत  फक्त मात्रांकडे लक्ष दिलें आहे. वृत्तांची अन्यव्यावर्तक अशी जी ही खूण ती निदानसूत्र फक्त पाळतें. त्याचप्रमाणें छंद:- शास्त्रांतील वेदांत आलेल्या वृत्तांच्या चर्चेचा भाग सुध्दां हा नियम पाळतो. ह्या भागामध्यें सदोष पद्यांचीं लक्षणें  देण्याचा निरर्थक व निरुपयोगी प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, त्यांमध्यें असलेल्या देवता, वर्ण, स्वर, ऋषींचीं कुलें  वगैरे हीं सदोष पद्यांचीं वृत्तालक्षणें कशीं होऊं शकतात हें कळत नाहीं. परंतु वैदिक वृत्तांसंबंधींच्या ह्या निर्बंधरहित व घोटाळयाच्या नियमांच्याच जोडीला छंद:शास्त्रांत निबंधयुक्त, विचार करून बसविलेले व बारीक सारीक भेद लक्षांत आणून देण्यास समर्थ असे मानवजातीचें पराकाष्ठेचें बुध्दिवैभव खर्च करून तयार केलेले नियम दिले आहेत. त्यांचे तीन समुच्चय करतां येतील.

पहिल्या समुच्चयामध्यें ' गणच्छंद ' नामक वृत्तें येतात. दुसऱ्या समुच्चयामध्यें परस्परांशीं निकट संबंध असलेलीं  मात्राछंदवृत्तें येतात.

तिसऱ्या समुच्चयामध्यें ' अक्षरछंद किंवा वृत्त ' नामक  वृत्तें येतात व हीं पुन्हां विषम, अर्धसम, व समवृत्ता अशीं  तीन प्रकारचीं आहेत.

वेदांतील २१ वृत्तें येथें मूळ पाया समजून त्यांवर सर्व इमारत रचली आहे. आणि प्रत्येक अक्षरांच्या निश्चित मात्रा दिल्या असल्यामुळें दोन रचनांच्या पध्दतींतील भेदास कितीहि निश्चित स्वरूप देण्याचा प्रयत्न केला असला तरी, येथें छंद:शास्त्राची दिशा योग्य रीतीनेंच आंखली गेली आहे असें म्हटलें पाहिजे. निदानसूत्रांतील उपांत्याच्या  नियमानें वैदिक वृत्तांशीं जोडलेला धागा येथें तसाच पुढें चालू ठेविला आहे. ह्या निदानसूत्रांतील पध्दतीचा वेदकालीन वृत्तपध्दतीशीं पूर्वीचाच  संबंध होता. परंतु ब्राह्मणग्रंथांनीं पवित्र मानिलेलें अक्षरांची संख्या हें वृत्ताचें मूलत्व अंधभक्तीनें पाळल्यामुळें तो संबंध प्राचीन वृत्तपध्दतीपासून दूर सारला गेला होता. परंतु लौकिक वृत्तपध्दतीचा यापासून पुढें विकास होऊन तिला नियमित मात्रांचें स्वरूप प्राप्त झालें व सप्तच्छंदांसि चतुरुत्तराणि ह्या पध्दतीपासून तिची पूर्ण मुक्तता झाली.

निदानसूत्रांतील उपांत्याच्या नियमांचे छंद:शास्त्रांतील वृत्त- पध्दतीमध्यें कसें स्थित्यंतर झालें हें दर्शविणारीं मधलीं स्थानें आपणांस सध्यां उपलब्ध नाहींत हीं गोष्ट खरी आहे. हें स्थित्यंतर दर्शविणाऱ्या कालाविषयीं आपल्यापाशीं सध्यां  कांहींच आधार नाहीं. किंवा लौकिक वृत्तांत आढळणारा मात्रांचा नियम हा निदानसूत्राच्या वेळीं होताच व पिंगलाच्या काळीं तो परिणतावस्थेस प्राप्त झाला. ह्या ग्रंथांत उपांत्यांचा नियम आढळतो तो केवळ येथें प्रथमच उद्भवला नसून, तेथें तो वेदकालीन छंद:शास्त्रामध्यें लौकिक वृत्तपध्दतींतलें  हें एक नवीनच तत्व म्हणून घुसडून दिलें आहे कीं काय अशी शंका येते.

हा ग्रंथ पिंगलाचार्यांचा आहे किंवा नाहीं हें ठरविण्याकरितां समाविष्ट विषयाचें पर्यालोचन करून निश्चयानें फारसें सांगतां येणार नाहीं, तथापि, टीकाकारांच्या मतें कोणता भाग पिंगलाचार्यांनीं स्वत: लिहिलेला आहे व कोणता मागाहून आला आहे ह्याचें विवेचन करतां येईल. या ग्रंथांतील विषयांचें थोडक्यांत स्वरूप असें आहे. पहिल्या भागांत तीन अक्षरांच्या पादांची बीजगणिताच्या धर्तीवरील नांवें दिलीं आहेत. त्याचप्रमाणें कमी अक्षरांच्या वृत्तांचीं व  जास्त अक्षरांच्या वृत्तांचीं नांवें दिलीं आहेत. दुसऱ्या विभागांत गद्य भागांत वेदांतील आढळणारीं देवांचीं व असुरांचीं वृत्तें दिलीं आहेत.
 
तिसऱ्या विभागांत अक्षरांच्या संख्येनें मोजलीं जाणारीं  नेहमींचीं सात वृत्तें दिलीं आहेत.

चवथ्या विभागाच्या सुरुवातीस पहिले सात नियम दिले आहेत; त्यांत अतिच्छंद व कृति नामक वृत्तांच्या इतरांच्या पेक्षां जास्त असणाऱ्या १४ स्थानांची पुस्ती जोडण्यांत आली आहे. आठव्यापासून शेवटपर्यंत लौकिक वृत्तांचा विचार केला आहे.

पांचव्या विभागांत सर्व वृत्तछंदांचा विचार केला आहे. हे अक्षरांच्या संख्येनें व मात्रांनीं मोजले असून, ह्यांच्या पादांतील अक्षरें असम आहेत. चरणाच्या ठिकाणीं असम आहेत अशा कांहीं छंदांचा येथें विचार केला आहे.

सहाव्या व सातव्या विभागांत ज्या वृत्तांचे पाद सम आहेत अशांचाच विचार केला आहे.

आठव्या विभागाचे दोन भाग आहेत. पहिला भाग  ऋग्वेदांतील पाठांत व यजुर्वेदांतील दोन हस्तलिखित प्रतींत  सांपडत नाहीं. परंतु तो यजुर्वेदांतील तिसऱ्या हस्तलिखित प्रतींत सहाव्या आणि सातव्या विभागाची पुरवणी म्हणून दिला आहे. दुसऱ्या भागामध्यें वृत्तााच्या एका विवक्षित रूपाच्या ऱ्हस्व व दीर्घ अक्षरांच्या स्थानांची किती  अदलाबदल होईल हें दाखविणारे सूत्रात्मक नियम दिले आहेत.

वरील विवेचनावरून असें स्पष्ट दिसून येईल कीं, ह्या ग्रंथाची पद्यात्मक प्रस्तावना त्याचप्रमाणें आठव्या अध्यायाचा पूर्वभाग व प्राय: अपरभाग हीं मुळांत नसावींत. अग्नि-पुराणांतील छंदांच्या पद्यात्मक अनुक्रमांत हे श्लोक येत नाहींत. दहाव्या शतकांतील हलायुध नांवाच्या टीकाकरानें आपल्या टीकेच्या सुरुवातीस हे श्र्लोक दिले आहेत; परंतु त्यांवर त्यानें मुळींच टीका केली नाहीं ही एक विशेष व लक्षांत ठेवण्याजोगी गोष्ट आहे. मधुसूदन सरस्वतीनें छंद:- सूत्रांतील विषय सांगतांना ह्या श्र्लोकांचा मुळींच विचार केला नाहीं. तो दुसऱ्या परिच्छेदापासून सुरुवात करतो हें  लक्षांत ठेवलें पाहिजे. आंतील विषयाकडे लक्ष देतां असें दिसून येईल कीं आठवा विभाग सहाव्या व सातव्या विभागाची  पुरवणी आहे. अग्निपुराण किंवा वृत्तरत्नाकर ह्या ग्रंथांमध्यें ह्या विभागाचा उल्लेख येत नाहीं. अग्निपुराणामध्यें जरी दुसऱ्या विभागाचा उल्लेख केला आहे तरी तो तेथें मागाहून घुसडून दिला असावा असें दिसतें.

दुसरा व तिसरा हे विभाग पिंगलाचार्यांनीं स्वत: लिहिले असावेत.
 
ह्या ग्रंथांतील वेदकालीन वृत्तांचा भाग हा ह्या ग्रंथाचा  मुख्य गड्डा आहे व लौकिक वृत्तांचा भाग मागाहून जोडला आहे असें मधुसूदन सरस्वतीचें म्हणणें आहे.

वेदकालीन वृत्तभाग लौकिक वृत्तभागापेक्षां प्राचीन आहे  असें कांहीं विद्वानांचें मत आहे. भरभक्कम पुरावा ह्या मतास नाहीं म्हणून वेवरनें हें मत स्वीकारलें नाहीं. त्यानें ह्या मताला विधायक आणि विनाशक अशीं कारणें दिलीं आहेत.

यजुर्वेद व ऋग्वेद ह्यांमधील पाठांतील भेद, अग्निपुराणांत आलेली पद्यात्मक पुनरावृत्ति व हलायुधानें दिलेलें मूळ ह्यांचा वेबरनें विचार केला आहे. पण त्यानें उपयोगी ऐतिहासिक सत्य अवगत करून दिलें असें म्हणवत नाहीं.