प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
छंद:शास्त्र आणि कृति.- छंद:शास्त्राच्या उत्तर- कालीन इतिहासांत ' कृति ' नांवानें सामान्य निर्देश केलेल्या वृत्तांच्या सात वाढींचा विचार केला पाहिजे.
ह्या पूर्वीच्या ' सात अतिच्छंदांहून ' निराळया असून शेवटच्या अतिच्छंदापेक्षां ह्यांत चार अक्षरें जास्त असतात. ऋग्वेदसंहितेमध्यें एकहि ' कृति ' नाहीं. परंतु वाजसनेयि संहितेमध्यें 'संस्कृति' नामक प्रकाराशिवाय ' कृति ' छंदाचे बाकीचे सर्व प्रकार येतात. ' ब्राह्मण ' व ' सूत्र ' ग्रंथांतील छंद:पध्दतींमध्यें ह्या ' कृति ' वृत्तांचा मुळींच उल्लेख नाहीं. वरील विधानास एक अपवाद शतपथ ब्राह्मणांत असून तेथें एका वृत्ताचें नांव ' विकृति ' असें दिलें आहे. हाच उतारा कात्यायनानें दिला आहे. हलाख्य व महीधर ह्या दोघांचें असें मत आहे कीं, ह्या ' विकृती ' सच ' कृति ' म्हणावें. त्या वृत्ताला ' कृति ' हें नांव प्राप्त होण्यास त्यांत ऐशीं अक्षरें असावयास पाहिजेत. परंतु त्यांत तर फक्त त्र्याहत्तारच अक्षरें आहेत. त्याला ' विकृति ' म्हणावें तर त्यांत अठ्ठयायशीं अक्षरें नाहींत. वरील महत्वाच्या भेदावरून उध्दृत उताऱ्यांतील कृति हा शब्द उपर्युक्त कृति वृत्ताच्या सात प्रकारांचा द्योतक घ्यावयाचा नसावा असें अनुमान निघतें. एवढेंच नव्हे, तर ह्या पुराव्यावरून ' कृति ' नामक छंद:- पध्दति त्या काळीं विद्यमान होती असें सिध्द होणें उलट कठिणच जातें. परंतु हें कांहींहि असलें, तरी पुढें निश्चितावस्थेस प्राप्त झालेल्या पारिभाषिक शब्दांनां ह्या ठिकाणीं सुरुवात होते ही गोष्ट कोणीहि नाकबूल करणार नाहीं.
ज्याप्रमाणें पूर्वी ' शक्करी ' हें नांव एका विशिष्ट पद्यसमुच्चयास लावीत असत व नंतर त्या पद्यसमुच्चयाच्या वृत्तास शक्करी हें नांव लावण्यांत आलें, त्याप्रमाणें ह्या एकाखऱ्या 'विकृति' पद्यापासून निघालेल्या नांवाचा इतर सदृश वृत्तांच्या ठिकाणीं अतिदेश करण्यांत आला असावा. असल्या प्रकारच्या सर्व नांवांच्या उत्पत्तीस वरील गोष्ट कारण झाली असावी. किंवा कदाचित् ह्या दोन्ही म्हणजे ' कृति ' व 'विकृति' या नांवांचा संबंध केवळ काकतालीयहि असेल. कारण, असलेंच दुसरें ' संकृति ' हें नांव एका सामास लाविलेलें असून त्याचा ' कृति ' छंदाशीं कोणत्याहि प्रकारचा संबंध नाहीं.
कृति हा समुच्चय भाषेंतील सर्व धार्मिक ग्रंथ वृत्तस्वरूपांत असावे ह्या इच्छेनें उत्पन्न केला गेला असावा असें वाटतें. तथापि, भाषेंतील जास्त अक्षरें असणाऱ्या बडया ग्रंथांबरोबर लहान गद्य ग्रंथहि आपल्या ताब्यांत असावे अशी तत्कालीनांनां इच्छा झाली होती. ह्या इच्छेमुळेंच त्यांनीं वृत्तांनां व्यवस्थित रूपें व नांवें दिलीं. इतकेंच नव्हे तर ' कृति ' सारख्या वृत्तहीन गद्य उताऱ्यांनां सुध्दां सुव्यवस्थित रूप दिलें. मोठया ग्रंथाप्रमाणें पुढें हाच न्याय लहान ग्रंथांसहि लागला. उत्तरकालीन पध्दतींत बऱ्याच वृत्तांनां योग्य नांवें मिळालीं. ब्राह्मणकालामध्येंच ह्या नामकरणव्यवस्थेस सुरुवात झाली होती असें स्पष्ट दिसून येतें. देव वृत्तांचें रूप घेऊन पृथ्वीवर आले अशी कथा ब्राह्मणांत दिली आहे; व देवांचीं, असुरांचीं, मनुष्यांचीं, विष्णूचीं, व मरुतांचीं वृत्तों अशी वृत्तांची वांटणीहि झाली आहे.