प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
छंद:शास्त्राची वाढ.- वैदिकवृत्तविषयक तिसरा ग्रंथ म्हटला म्हणजे ऋक्प्रातिशाख्य हा होय. यांत शेवटच्या भागांत छंदांचा विचार केला असून कोणते स्वर पद्याच्या कांहीं भागांत दीर्घ होतात हें दिलें आहे. तिसरें पटल महत्वाच्या दृष्टीनें गौण आहे.
वृत्ताविषयक चवथा ग्रंथ म्हटला म्हणजे ऋग्वेदानुक्रमणीचा वृत्तविषयक भाग. वाजसनेयि संहितेचा कांहीं भाग हा पांचवा ग्रंथ होय. ह्या दोन ग्रंथांतील परस्परसंबंधाचा विचार येथें कर्तव्य नाहीं. ह्या दोन ग्रंथांपैकीं आधीं कोणता लिहिला गेला, दोन ग्रंथांतील सदृश व विसदृश स्थळें कोणतीं व कोणताहि ग्रंथ पूर्वकालीन धरला असतां त्यास अनुकूल व प्रतिकूल कारणें कोणतीं या विषयावर वेवरनें थोडेंसें विवेचन केलें आहे.
पिं ग ल.- ज्याला वेदकालीन म्हणतां येईल असा शेवटचा वृत्तविषयक ग्रंथ म्हटला म्हणजे पिंगलाचार्यांच्या छंद:सूत्राचा वेदांग ह्या नांवानें निर्दिष्ट केलेला भाग हा होय. पिंगलाचार्यांच्या ग्रंथाचे दोन पाठ आहेत. एक ऋग्वेदाचा व दुसरा यजुर्वेदाचा. ह्यांतील वृत्तविषयक भाग सामवेदाच्या तिसऱ्या पाठांत थोडाबहुत तसाच ठेवण्यांत आला आहे. हें परिशिष्ट गर्गाचार्यांनीं बरेच वेळां 'सामगानां छंद:' ह्या नांवानें उल्लेखिलें आहे. त्याचा निदानसूत्राशीं थोडासा संबंध आहे; परंतु तो भाग गलाचार्यांच्या ग्रंथातला उतारा आहे व त्यांतील आधार व पिंगलाचार्यांच्या ग्रंथांतील आधार हे जुळतात.
दुसऱ्या अध्यायामध्यें ऋक्प्रातिशाख्यांतील सात नांवांखालीं येणाऱ्या देव, असुर, प्रजापति, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद व ब्रह्मन् ह्यांची वृत्तें विशद करून सांगितलीं आहेत.
तृतीय अध्यायांत अपूर्ण पाद, स्वरभक्ति व अर्धस्वर अशी विभजना करून पुरा करावा असें सांगून व अक्षरांची संख्या हीच ८ अक्षरांच्या गायत्री, १२ अक्षरांच्या जगती, १० अक्षरांचे विराज् व ११ अक्षरांचे त्रिष्टुभ् यांच्या चार पादांची द्योतक खूण आहे असें म्हटलें आहे. नंतर वरील वृत्तांमध्यें चार पादांनीं एक पूर्ण ऋचा होते असें सांगून मग प्रत्येक वृत्ताचा विचार केला आहे.
शंकुमती व ककुब्मतीवर सामान्य विधानें केलीं आहेत. पिपीलिकामध्या व यवमध्या ह्या शब्दांच्या अर्थांचें विवरण केलें आहे. निचृत्, भुरिज्, विराज्, स्वराज् वगैरे वृत्तांसंबंधानें कांहीं विधानें केलीं आहेत. हीं विधानें ऋक्प्रातिशाख्यांतील व अनुक्रमणीमधील विधानांशीं जुळतात. येथेंच असें लिहिलें आहे कीं पद्याचें वृत्त अनिश्चित असेल तर पद्याच्या सुरुवातीकडे म्हणजे पहिल्या पादाकडे व त्या ऋचेच्या देवतेकडे लक्ष द्यावें. बहुधा तो पाद, ज्या देवतेला स्तुति करून बोलाविलें असेल ती ज्या वृत्ताची अधिष्ठात्री असेल त्याच वृत्ताशीं जुळेल. ह्या व अशा असंबध्द विवेचनांत वृत्तविषयक मूलतत्वाची कल्पना दिसत नाहीं. ह्यायोगानें वेदकालीन छंद:शास्त्र कसें नाश पावलें हें स्पष्ट दिसून येतें. शेवटीं कृति व अतिच्छंद वृत्तांचें वर्णविवेचन आहे.
येथें वेदकालीन ग्रंथातलें वृत्ताविषयक विवेचन संपलें. आतां आपणांला, लौकिक वृत्तांवर प्रमाणभूत म्हणून गणला जाणारा असा पिंगलाचार्यांचा छंद:सूत्र नांवाचा जो ग्रंथ आहे त्याचा परामर्श घेतला पाहिजे. हा वृत्तविषयाशीं संबध्द ग्रंथ सर्व ग्रंथांनां प्रमाणभूत आहे. वैदिक वृत्तें व लौकिक वृत्तें यांवर पिंगलाचार्यांचे दोन निरनिराळे ग्रंथ नसून एकाच ग्रंथांत या दोहोंसंबंधीं माहिती दिली आहे.