प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
चिनी छंद:शास्त्र.- चिनी भाषेंतील प्राचीन पद्ये बहुधा प्रत्येक ओळींत चार शब्द या नियमानें रचलेलीं असत. पण कधीं कधीं ओळीमध्यें एक शब्दापासून आठ शब्दांपर्यंत संख्याहि आढळते.पद्यें चार ओळींचे एक अशी असून त्यांतील पहिली,दुसरी व चवथी ओळ एका यमकांत असते.दुसरें एक प्राचीन वृत्त उपलब्ध आहे त्यांत पहिल्या दोन ओळी प्रत्येक तीन शब्दांच्या आणि तिसरी ओळ सात शब्दांची असते,व तिन्ही ओळींत यमक साघलेलें असतें.या वृत्तांत कांहीं फार उत्तम अशा करूणरसयुक्त कथा असलेल्या चिनी कविता आहेत.
ख्रिसपूर्व ४ थ्या शतकांत एक निराळेच अनियमित वृत्त प्रचारांत आलें व त्यांत आवेशसुक्त व रंगेल अशी पद्यें होऊं लागून तें फारच लोकप्रिय झालें, इतकें की अद्यापपर्यंतहि तें प्रचारांत आहे. ख्रिसपूर्व २ऱ्या शतकांत सात शब्दी व पांच शब्दी अशीं नवी वृत्तें सुरू झालीं व त्यांत थोडाफार सुधारणा होऊ हल्ली तीं चिनी छंदशास्त्रातील प्रमुख वृत्तें बनली आहेत. यांपैकी सात शब्दि वृत्त केव्हां कोणी सुरू केलें याचा पत्ता लागत नाहीं.पांच शब्दि वृत्त मोइ शेंग या कविवर्यानें परिणत स्वरूपास नेलें.या कवीचा मृत्यू ख्रिस्तपूर्व १४० सालीं झाला.त्यानंतर ७ शतकांनीं तंग घराण्याच्या कारकीर्दीत [इ.स.६१८-९०५] चिनी काव्याच्या इतिहासांतला अत्यंत उज्ज्वल काल सुरू झाला. या तीनशें वर्षांत मोठया योग्यतेचे असे कवी पुष्कळच होऊ गेले.
या काळांत कवितेंतील स्वरांसंबंधाचे नियम पूर्णत्वास पोहोंचलें. पद्यरचनेच्या सोयीकरितां चिनी भाषेंतील सर्व शब्दांचे दोन वर्ग पाडण्यांत आले; एक वर्ग ऋुजु शब्दांचा,व दुसरा वक्र शब्दांचा. ऋुजु शब्दांचे हल्लीं दोन प्रकार असतात,पण ११ व्या शतकापर्यंत ते सर्व एकाच प्रकारचे मानीत असत. वक्र शब्दांचे ऊर्ध्वगामी, अधोगामी व प्रवेशक असे तीन प्रकार करण्यांत आले.सर्व स्वरांचे भेद तीव्र [शार्प] व शुद्ध अथवा मध्यम [फ्लॅट] या दोन संज्ञांनी व्यक्त करतां येण्यासारखे आहेत. याप्रमाणे सर्व चिनी वृत्तें स्वरविषयक नियमांनीं निगडित करण्यांत आलीं. उजवीकडून डावाकडे व वरून खालीं याप्रमाणे चिनी भाषेंत पद्य वाचीत गेले असतां पांच शब्दा कवितेंतला स्वरनिर्देश पुढील प्रमाणें करतां येईल:-
तीव्र | मध्यम | मध्यम | तीव्र | (शार्प) |
तीव्र | मध्यम | मध्यम | तीव्र | (शार्प) |
मध्यम | तीव्र | मध्यम | तीव्र | (शार्प) |
मध्यम | तीव्र | तीव्र | मध्यम | (फ्लंट) |
तीव्र | मध्यम | तीव्र | मध्यम | (फ्लंट) |
सात शब्दी कवितेंतला स्वरनिर्देश पुढीलप्रमाणे:-
मध्यम | तीव्र | तीव्र | मध्यम |
मध्यम | तीव्र | तीव्र | मध्यम |
तीव्र | मध्यम | मध्यम | तीव्र |
तीव्र | मध्यम | मध्यम | तीव्र |
मध्यम | तीव्र | मध्यम | मध्यम |
मध्यम | तीव्र | तीव्र | मध्यम |
तीव्र | मध्यम | तीव्र | तीव्र |
चिनी भाषेंतील अनेक वृत्तांपैकी नमुन्याकरितां वर दोन दिलीं आहेत, व त्यांवरून चिनी पद्यांमध्यें यमकरचना कशी असते त्याची कल्पना वाचकांस येईल. अशी वृत्तरचना व तिच्या जोडीला उत्तम शब्दयोजना असली म्हणजे ती कविता फारच कर्णमधुर होते. उत्तम शब्दयोजना करणें म्हणजे ही केवळ सोपी गोष्ट नाहीं. आपल्याकडे अक्षरगणवृत्तें तयार करण्यास प्रत्येक शब्दाचा प्रत्येक अक्षराच्या निश्र्चित लघुगुरूतेमुळें जी अडचण होते ती अडचण चिनी वृत्तरचनेपुढे कांहीच नाहीं. कां कीं, त्यांच्या भाषेंत अगोदरच सात ध्वनिरोह निश्र्चित आहेत आणि त्या ध्वनिरोहांकडे लक्ष देऊ वृत्तांतील उचनीचस्थान साधावें लागतें त्या ध्वनिरोहांची कल्पना थोडीशी येथे दिली पाहिजे.
ध्वनिरोह म्हणजे एकाच शब्दाची निरनिराळीं रूपें तयार करण्याकरितां त्याच्या उच्चारांमध्ये जो ठराविक फेरबदल करावा लागतो तो. या प्रकारचे ध्वनिरोह स्पष्टपणे उच्चारून चिनी वाक्य बोलूं लागलें असतां ऐकणाराला गायन चालू असल्यासारखा भास होतो. ह्या ध्वनिरोहांचे मूळ चार भेद- ऋुजु, ऊर्ध्वगामी, अधोगामी व प्रवेशक-आहेत. व या प्रत्यकाचे उच्च (अपर) व नीच (लोअर) असे दोन दोन पोटभेद आहेत. कॅंटनकडील प्रदेशांतल्या भाषेंत हे आठहि ध्वनिरोह प्रचलित आहेत. पण पेंकिगकडील भाषेंत ऋुजुउच्च, ऋुजुनीज, ऊर्ध्वगामी व अधोगामी अशा चारच ध्वनिरोहांचा उपयोग करतात. या ध्वनीरोहपद्धतीची उत्पत्ती व वाढ कशी झाली याचा इतिहास उपलब्ध नाही. तथापि ख्रि.पू. तिसऱ्या शतकापर्यत ऋुज,ऊर्ध्वगामी व प्रवेशक असे तीनच ध्वनीरोहक प्रचारात होते तेव्हापासूनच इ.स.४ थ्या शतकापर्यंतच्या काळांत अधोगामी हा ध्वनिरोह तयार झाला. ११ व्या शतकात ऋुजु चे उच्च व नीच असे प्रकार झाले. पेकिंगकडील चार ध्वनीरोहांनी एकच शब्दाचे चार निरनिराळे अर्थ कसे बदलतात ते पुढील उदाहरणावरून दिसून येईल. १ला 'ऋुजु उच्च' ध्वनीरोह: मृत ? (उच्च व सारख्या आवाजात); २ रा 'ऋुजुनीच' ध्वनीरोह: मृत ? (साधा प्रश्न); ३रा 'ऊर्ध्वगामी' ध्वनीरोह: मृत ? (अविश्वसनियतादर्शक प्रश्न); ४ अधोगामी ध्वनीरोह: मृत (जलद व निश्चित उत्तर). आता वाक्यांतील प्रत्येक शब्द ध्वनीरोह विषयक नियमानुसार जोर देऊन उच्चारावा लागतो असे नाही. कित्येक शब्दांवर असा जोर मुळीच नसतो कित्येक शब्दांचे ध्वनीरोह कांही अंशी उच्चार भेदाने व काही अशी वाक्यातील स्थानावरून दिग्दर्शित केले जातात.
येणें प्रमाणें जो भाषच संगीतात्मक ती आपले छंद:शास्त्र संगीताने अस्पृष्ठ कसें ठेवील. छंदशास्त्र आणि संगीतशास्त्र याचा निकट संबंध चिनी कवितेंत जितका व्यक्त होतो तितका अन्यत्र होत नाहीं असें म्हणतां येईल.