प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.          


छंद:शास्त्राचें नामकरण.- शास्त्रेतिहासामध्यें शास्त्राचें नामकरण हा एक महत्वाचा प्रश्न आहे. पुष्कळ शास्त्रांचें  नामकरण झालें म्हणजे शास्त्र जन्मास आलें असें लोकांस
वाटूं लागतें. यासाठीं आपण छंद:शास्त्राच्या नामकरणाकडे वळूं.

वेदकालीन वृत्तांना ' छंदस् ' हें नांव आहे, तथापि उत्तारकालीन वृत्तांनां देखील हा शब्द मधून मधून आज वापरण्यांत येतो. ह्या शब्दाचा अर्थस्पष्टीकरणपर परामर्श
यास्क, शंकराचार्य, विनायक यांसारख्या जुन्या ग्रंथकारांनीं  व वेस्टरगार्ड, ऑफ्रेक्ट, कुहन्, मुल्लर वगैरे पाश्चात्यांनीं घेतला आहे. '' भारतीय अभ्यास '' ( ग्रंथ आठवा ) ह्यामध्यें वेवरनें छंद:शास्त्रावर एक मोठा पांडित्यपूर्ण लेख लिहिला आहे. त्या लेखांत ह्या शब्दाचा अर्थ ' इच्छागान ' व  पर्यायानें ' वृत्ता ' असा केला आहे. इच्छा, इच्छागान, वृत्ता हे तीनहि अर्थ सारखेच खरे आहेत असें त्याचें मत आहे. कारण, ह्या सर्वांचा उगम छंद् = इच्छा करणें या एकाच धातूपासून होतो आणि ' छंद ' याचा अर्थ ' मनाला प्रसन्न  करणारें गानामध्यें रुचिर असें वृत्ताचें रूप ' असा आहे. ' छंद ' शब्दाच्या अर्थनिर्णयासाठीं किंवा अर्थवाद म्हणून ब्राह्मणांमध्यें ' छंदस् ' शब्दाची फोड वरीलप्रमाणेंच केली  आहे. शतपथ ब्राह्मणांत ८. ५, २१ मध्यें '' वृत्तांनीं त्याला संतुष्ट केलें म्हणून वृत्तांनां ' छंदस् ' म्हणतात '' अशी या शब्दाची व्याख्या केली आहे.