प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
छंद:शास्त्रांतील अक्षरसंख्यासमहत्वास अपवाद.- या अक्षरगणनातत्तवावर फार जोर देऊन उपयोगी नाहीं. कारण ' एक दोन अक्षरें कमी किंवा जास्त असल्यानें कांहीं बिघाड होत नाहीं ' असें बऱ्याच ठिकाणीं म्हटलेलें आहे. असें जरी आहे तरी अक्षरांची संख्या हेंच मूलतत्व समजलें गेलें आहे. ही गोष्ट यज्ञयागादि कर्मकाण्डांतल्या आचारपध्दतींतील नेहमींच्या उपयोगावरून स्पष्ट दिसून येते. विधीकरितां किंवा अर्थवादिक तुलनेकरितां जर कांहीं विशिष्ट ऋचा लागणाऱ्या असतील, परंतु त्या विशिष्ट ऋचांतील अक्षरांची संख्या जर पाहिजे तितकी नसेल, तर पुन्हां अक्षर-विभागणी होई. ऋचेच्या स्वरूपाकडे किंवा तदंतर्गत विषयाकडे लक्ष न देतां अक्षरें मोजून तीं वृत्ताच्या अक्षरसंख्येप्रमाणें विभागलीं जात आणि ज्या वृत्तामध्यें अमुक इतकीं अक्षरें आहेत त्या वृत्तामध्येंच त्या ऋचा लिहिल्या आहेत असें समजत.