प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
चौदावे व पंधरावे शतक.– उत्तरहिंदुस्थानाकडील संगीत पद्धतीच्या प्रगतीच्या इतिहासात १४ वें १५ वें ही दोन शतकें अत्यंत महत्वाची होत. हा काल मुसुलमानी अमदानीचा होता, व पुष्कळ मुसुलमान बादशहांच्या पदरी चांगले संगीतज्ञ असून त्यांच्यामुळें संगीताच्या प्रसारास पुष्कळच मदत झालेली आहे. या वेळेपासून हिंदी संगीतात इराणी तऱ्हेचा प्रवेश झाला आणि त्यामुळें उत्तर व दक्षिण संगीत पद्धतीत निश्चित स्वरुपाचा फरक दिसूं लागला. सुलतान अल्लाउदीनाचे दरबारी अमीर खुसरु नांवाचा सुप्रसिद्ध संगीतज्ञ होता. तो कवि आणि संगीतांत असून शिवाय लढवय्या आणि मुत्सद्दीहि होता. त्याने दोघां सुलतानांच्या कारकीर्दीत मंत्र्याचे काम केले होते. संगीतांत कवाली म्हणून हिंदी आणि इराणी या दोन पद्धतीतून निघालेली एक मिश्रपद्धति आहे ती यानें सुरु केली आणि अर्वाचीन रागांपैकी कित्येक याने प्रचारांत आणले. वीणानामक वाद्यांत सुधारणा करुन बनविलें सतार हें वाद्य प्रथम यानेंच सुरु केलें. अमीर खुसरु आणि विजापूरच्या दरबारचा एक गोपाळ नाईक या दोघांमधील सामन्याबद्दल एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदां गोपाळ हा सुलतानाच्या दरबारीं एक सुंदर पद्य गाऊन दाखवीत असतां अमीर खुसरु हा राजाच्या सिंहासनाखालीं लपून बसला होता आणि गोपाळाचे गाणें संपल्यानंतर त्याने गोपाळानें म्हटलेल्या रागांतील पद्यें त्याच्या इतकींच नव्हे तर त्याहूनहि अधिक सरस रीतीने म्हणून दाखविली. मुसुलमानी इतिहासकार असें सांगतात कीं, दक्षिण हिंदुस्थान जिंकून परत जातांना त्यांनी दक्षिण हिंदुस्थानांतील बरेच सुप्रसिद्ध गवयीहि आपल्या बरोबर नेले. या गवयांप्रमाणे दक्षिणेंतील उत्तम कारागीर व शिल्पकारहि आपल्या नव्या इमारती बांधण्याकरिता उत्तर हिंदुस्थानांत नेले होते.