प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
छंदःशास्त्र व संगीतशास्त्र यांतील भेद व त्यांचा परस्परसंबंध.- छंदःशास्त्र आणि संगीतशास्त्र हीं दोन एकमेकांशी संबद्ध शास्त्रें आहेत. उच्चार हळू किंवा मोठयानें होऊ शकतो. उच्चाराचा हळूपणा किंवा मोठेपणा लक्षांत घेऊन जेव्हां उच्चारांची योजना विशेष कर्णमधुर करण्याचा प्रयत्न करण्यांत येतो तेव्हां त्यास आपण संगीत म्हणतों. एका सुरावर किंवा एका किंमतीच्या स्वरांत देखील शब्दांतर्गत भाषाविशिष्ट आघाताच्या साहाय्यानें, किंवा उच्चार करण्यास जो कमीजास्त वेळ लागतो तेवठयाकङेसच लक्ष देऊन, आपण अक्षरमाला कर्णमधुर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हां तीस आपण वृत्त किंवा छंद म्हणतो. छंदांत केवळ शब्दयोजनेच्या साहाय्यानेंच थोङेंबहुत संगीत उत्पन्न् केलेलें असतें. म्हणजे संगीताचें वृत्त हें प्राथमिक स्वरुप होय. छंद:- शास्त्र आणि संगीतशास्त्र हीं दोन्ही शास्त्रें फार जुनीं आहेत तथापि असेंहि म्हणतां येईल कीं संगीतापेक्षां छंदःशास्त्राचा विकास अगोदर झाला असला पाहिजे कां कीं, बहुतेक राष्ट्रांतील संगीत वृत्ताश्रयी आहे. संगीत आणि वृत्तें यांचा ऐतिहासिक संबंध येणेंप्रमाणे दाखवितां येईल. एखादें वृत्त तयार झाले म्हणजे तें वृत्त निरनिराळ्या चालींवर म्हणण्यांत येऊं लागतें. तें तसें म्हणण्यांत येऊ लागलें म्हणजे संगीतवेत्ता वृत्तांतील अक्षरांकङे दुर्लक्ष करुन स्वरोच्चाराच्या उच्चनीचतेकङे व क्रमाकडेच लक्ष देऊं लागतो आणि म्हणण्याच्या चाली तयार करतो. पुढें असाहि काल येतो कीं, जेव्हां गाता किंवा संगीतज्ञ केवळ सुस्वरतेची म्हणजे कर्णमाधुर्याची कसोटी लावून केवळ स्वरमालिकाच तयार करतो; हिलाच आपण चाल किंवा साम किंवा इंग्रजींत म्यूझिक म्हणतों. म्यूझिक तयार झालें म्हणजे तें उत्पादण्यासाठीं मागाहून शब्दरचना करावयाची असाहि क्रम दिसून येतो. शब्दरचना झाली म्हणजे पुन्हां असें पहावें कीं ही शब्दरचना आघातनियमांनी किंवा लघुदीर्घनियमांनीं मोजतां येते किंवा नाही. ती तशी मोजतां आली आणि मोजली गेली म्हणजें तें वृत्त झालें.
वृत्त आणि चाल यांमध्यें अधिकाधिक तफावत पङत जाते. ती इतकी कीं वृत्तांत जें लघु तें गातांना दीर्घ, आणि वृत्तांत जें दीर्घ ते गातांना लघु. असें होतां होतां पुढें संगीताची वृत्ताश्रयता मुळीच नाहींशी होते.