प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            
 
तंजावरची धुगधुगी:- दक्षिण हिंदुस्थान तंजावरची मराठा राजा तुळजाजी ( इ.स.१७६३ ते १७८७ )यानें जमिनी व इतर इनामें देऊन संगीतज्ञांना उत्तेजन दिले. त्यामुळे त्याच्या दरबारीं सर्व हिंदुस्थांनांतील गवई येत असत; आणि तंजावर हें हिंदुस्थानांतील संगीतकलेच्या उत्क्रर्षाचें एक प्रमुख स्थान बनले. या मराठी राजाने 'संगीतसारामृतभ्‌' या नावांचा एक प्रबंधहि लिहीला आहे. तंजावरचा मराठी राजांनी नाटकें करण्याकडेहि लक्ष घातलें होतें.

इ. स. १८१३ मध्यें पाटणा येथील महंमद रेझा नांवाच्या एका सरदारानें 'नामगत-ई- असफी' या नांवाच्या उत्तरेकडील संगीतवार एक टीकात्मक ग्रंथ लिहीला. त्यानें उत्तरेकडील निरनिराळया वर्गीकरणपद्धती आणि राग, रागिणी, पुत्र इत्यादी त्यांचा आधार ही दोन्ही निरूपयोगी ठरविलीं. त्यानें आपली स्वत:ची एक नवीनच पद्धती पुढे मांडली व त्यात निरनिराळे परस्परसदृश राग एकत्र केले. बिलावल स्वरमेलास शुद्ध स्वरसप्तक मानणारा हाच पहिला महत्वाचा ग्रथं होय. आज उत्तर हिंदुस्थनात हेंच श्शुद्ध स्वरसप्तक प्रचारांत आहे. तसेंच हल्लींच्या हिंदुस्थानी गवयांस त्याचीच रागांची लक्षणें उपयोगी पडतात असें म्हणतात.