प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
       

ज्ञानाचें एका संस्कृतींतून दुसर्‍या संस्कृतींत संक्रमण:- शास्त्रज्ञानाच्या इतिहासांतील एक महत्वाचा भाग म्हटला म्हणजे शास्त्रीय ज्ञान एका संस्कृतीतून दुसर्‍या संस्कृतींत गेलें कसें त्याचा इतिहास होय. पुष्कळदां असें आढळून येतें कीं, जेव्हां राष्ट्र रानटी स्थितींतून बाहेर पडतें, अगर त्या राष्ट्राचें जीवन विस्तृत होतें, तेव्हां त्या राष्ट्राची संस्कृति अधिक प्रगल्भ होते. उदयोत्सुक राष्ट्र प्राचीन आणि इतर राष्ट्रांचें अर्वाचीन ज्ञान जितकें एकत्र करतां येईल तितकें करीत असतें. संस्कृतीच्या इतिहासांत असले प्रयत्‍न अनेकदां दृष्टीस पडतात. ग्रीकांनी हिंदूचें ज्ञान पद्धतशीर मिळविण्यासाठी पुष्कळ खटपट केली व विद्वान् हिंदूंस त्यांनी आश्रय दिला. तीच हकीकत अरबांचीहि आहे. अरबांनीं ग्रीक व संस्कृत ग्रंथांचीं भाषांतरें केली आणि ज्ञान वाढविण्यासहि सुरूवात केली.

निद्रेंतून यूरोपीय राष्ट्रे जागीं झालीं तेव्हां त्यांनी अरबांचें ज्ञान मिळविलें. पुष्कळ प्राचीन यूरोपीयांचें ज्ञान त्यांस अरबी भांडयांतून प्यावें लागलें. आरिस्टाटल, टॉलेमी इत्यादिकांचे ग्रंथहि त्यांस ग्रीकमधून परिचित नसल्यामुळें अरबी भाषांतरांच्या लाटिन तरजुम्यांवरूनच परिचित करून घ्यावे लागले.

यूरोपीय संस्कृति हल्ली कठोरगर्भ झाली असून ती जगांतील इतर राष्ट्रांमध्यें आपल्या ज्ञानसंचयाचा प्रकाश पाडीत आहे.

या सर्व क्रिया स्पष्ट करणें म्हणजे ग्रीक, मिसरी व भारतीय लोकांपासून आजपर्यंतच्या ज्ञानाचा आढावा घेतला पाहिजे. भारतीय विज्ञानेतिहासास प्रारंभ करावयाचा म्हणजे भारतीय शास्त्रें संहितीकरणानंतर कशी काय वाढलीं हें पहावयाचें.