प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.            

नारदशिक्षा.– नारदशिक्षा हा ग्रंथ १० व १२ या शतकांच्या दरम्यान रचलेला असावा असें कित्येक लेखक समजतात.  कित्येक या ग्रंथास ख्रिस्तपूर्व अनेक शतकें घालतात. या ग्रंथाचा नारद या सुप्रसिद्ध पौराणिक व्यक्तीशी संबंध लावण्यांत येतो ती चूक आहे.  नाटयशास्त्र या ग्रंथातल्यापेक्षां सदरहू ग्रंथांत रागपद्धतींत पुष्कळ अधिक सुधारणा झालेली दिसते, आणि यानंतर झालेल्या संगीतरत्नाकारनामक सुप्रसिद्ध ग्रंथाशीं याचा ज्या बाबतीत मतभेद आढळतो त्यांपैकी कांही बाबतींत नारदशिक्षेचें कुटुमियामालै येथील शिलालेखांतल्या माहितीशी एकमत आहे.  नारदशिक्षा हा ग्रंथ १२ व्या शतकाच्याहि नंतरचा असावा असे कांही विद्वानांचे मत आहे.