प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
यज्ञविकासकालीन संगीतशास्त्रज्ञान.– अत्यंत प्राचीन काळी, म्हणजे ज्या वेळेस यज्ञ विकास पावूं लागले होते त्या वेळेस संगीतास पद्धति आली असावी असे वाटत नाही. जे काय त्या वेळेस संगीतविषयक ज्ञान असेल तें एवढेच असावे की, बऱ्याच चाली निरनिराळे प्रयत्न करणारांनी शोधून काढल्या असाव्यात आणि अमक्याची चाल, तमक्याची चाल एवढेंच त्या चालीचें नामकरण झालें असावे. चाली गोळा करणे, त्यांचे वर्गीकरण करणें, वर्गीकरण करण्यासाठीं ध्वनींचें पृथक्करण करणें इत्यादि क्रिया अधिक उत्तकालीन होत. त्या क्रिया क्रमाने होऊं लागल्या असाव्यात.
अमक्याचे गाणें, तमक्याचे गाणें अशा प्रकारचें साहित्य जमा झाल्यानंतर गांवांतली गाणी, जंगली गाणी असें वर्गीकरण स्वाभाविक आहे आणि प्रारंभी तसेंच झालें होते असें दिसते. तसेच आवाज किती मोठा असावा, फार ओरडून केलेलें गाणे आणि कमी ओरडून केलेले गाणें अशा प्रकारचे देखील वर्गीकरण संगीतशास्त्राची प्रथमावस्था दर्शविते. अनेक निरनिराळया चाली एकामागून एक म्हटल्यानें जो आनंद होतो तो निराळा हें ओळखून स्तोमाची कल्पना उत्पन्न झाली असावी.