प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.
प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.
लौकिकवृत्तविकास.- हलायुधासारख्या टीकाका- रांचा छंद:शास्त्राच्या इतिहासाला फारसा उपयोग नाहीं; एवढेंच नव्हे, तर पिंगलाचें छंद:शास्त्र हा वेदांगाचा ग्रंथ असला तरी छंद:शास्त्राच्या जवळ जवळ अंतिम विकासाचा बोधक आहे. त्यांत आजकाल लागणारें बहुतेक छंद:शास्त्र आलें आहे असें म्हणतां येईल (उ. शार्दुलविक्रीडितासारखीं अक्षरगणवृत्तों आणि आर्येसारखीं मात्रावृत्तें त्यांत आलीं आहेत). छंद:शास्त्रावरील अनेक ग्रंथ पाहिले म्हणजे छंदोविकास मुळींच हातीं लागणार नाहीं. पिंगल लौकिक वृत्तें पूर्णत्वाला पावलीं आहेत अशा स्थितींत ग्रंथ निर्माण करता झाला. लौकिकवृत्ताविकास पहावयाचा झाल्यास वैदिक वाङ्मय आपणच धुंडाळून छंद:शास्त्रविकास वसविला पाहिजे.
वेदकालांत कांहीं लौकिक वृत्तें असावींत तथापि त्यांस शिष्टवृत्तांत स्थान मिळालें नसावें. पुष्कळ वेळां असें होतें कीं सामान्य जनतेंत छंदांचे पुष्कळ प्रकार व्यक्तिच्या कल्पकतेमुळें तयार होतात. पुष्कळदां असेंहि होत असावें कीं, प्रयत्न ज्या वृत्तासाठीं होतो तें वृत्त न साधल्यामुळें वृत्ताचें एखादें विकृत रूप उत्पन्न होतें आणि तें विकृत रूप जरा बऱ्या स्वरूपाचें असलें तर त्याला शिष्ट स्वरूप प्राप्त होऊन तें मान्य वृत्त होतें. या प्रकारच्या कारणामुळें प्रचलित वृत्तें न मानण्याची पध्दति लोकांत नेहमीं आहेच.
वैदिक कालांत कांहीं लौकिक वृत्तें होतीं, पण तीं मान्यता पावलीं नव्हतीं. याला तैत्तिारीय संहितेंतच प्रमाण आहे. चयनाच्या विवेचनांत असल्या प्रकारच्या वृत्तांचा उल्लेख आलेला आहे.
तैत्तिारीय संहितेंत उल्लेखिलेले परंतु लौकिक प्रचारांत नसलेले असे जे कित्येक छंद अथवा वृत्तें आहेत, त्यांचीं नांवें तैत्तिारीय संहिता कांड ४, प्रपाठक ३, अनुवाक ७ येथें आढळतात. हीं नांवें येणेंप्रमाणें.-
मा छंद:, प्रमा छंद:, प्रतिमा छंद:, अस्त्रीवी छंद:, पृथिवी छंद:, अंतरिक्ष छंद:, धौश्छंद:, समा छंद:, नक्षत्राणि छंद:, मनश्छंद:, वाक्छंद:, कृषिछंद:, हिरण्यं छंद:, गौश्छंद:, अजा- छंद:, अश्वछंद:.