प्रस्तावनाखंड : विभाग पांचवा- विज्ञानेतिहास.

प्रकरण ५ वें,
वेदविद्या व तदुत्तर शास्त्रें-छंद व संगीत.       
 
सामवेदाची परंपरा - संगीतशास्त्राच्या प्राचीन वाङमयाचें म्हणजे सामवेदविषयक वाङमयाचें वर्णन झालें.आतां ज्या माणसांनीं या शास्त्राचें संवर्धन केलें त्यांकडे वळूं. आपणांस सामवेदाच्या परंपरेचें ज्ञान देणाऱ्या दोन प्रकारच्या याद्या प्राचीन ग्रंथांतून आढळतात.विद्येस गौरव देण्यासाठीं आणि तिचा प्रचार पृथ्वीवर कसा झाला हें सांगण्यासाठी प्रत्येक शास्त्राच्या इतिहासाचा विशिष्ट देवतेपासून उगम सांगणाऱ्या याद्या आपणांस प्रत्येक शास्त्राच्या ग्रंथांतून आढळतात.त्याप्रमाणेंच सामवेदाचीहि गोष्ट आहे.या प्रकारची जी एक परंपरा'सामविधान' ब्राह्मणाच्या शेवटीं दिली आहे ती अशी- १.प्रजापती, २.बृहस्पती, ३.नारद, ४.विष्वक्सेन, ५.व्यास, ६.पाराशर्य, ७.जैमिनीपौष्पिंडय, ८.पाराशर्यायण् व ९ बादरायण.

या प्रकारच्या यादींत इतिहास शोधावयास जाणें साहसाचें होईल. तथापि तेवढयावरून आपणांस इतिहासविषयीं निराश होण्याचें कारण नाहीं. पुष्कळ सामांचे प्रवर्तक आपणांस मंत्र, ब्राह्मणें व सूत्रें यांमध्ये उल्लेखिलेले दिसतात. त्या उल्लेखांवरून शास्त्रज्ञांचें पौर्वापर्य आज कदाचित् लावतां येणार नाहीं; तथापि शास्त्रप्रवर्तकांचा वर्ग किती मोठा होता व कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यत पसरला होता या प्रश्नावर त्यामुळें थोडासा प्रकाश पडेल.