प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

बौद्ध संप्रदाय - याचा संस्कृतीच्या इतिहासाशीं संबंध मुख्य हाच कीं, या संप्रदायामुळें भारतीय संस्कृतीच इतरत्र पसली; पण या संप्रदायानें पसरविलेल्या संस्कृतीचें स्वरूप जरासें निराळें होतें. एक तर ही संस्कृति पसरवणारा वर्ग निराळा होता. आणि दुसरें देश्य परंतु श्रौत विचारानें अस्पृष्ट अशा कल्पना बौद्ध संघानें पसरविल्या. तीच गोष्ट जैनांचीहि झाली असें म्हणतां येईल. फरक एवढाच कीं अतिभारतीयत्वाचें श्रेय जसें बौद्धांनीं मिळविलें तसें जैनांस मिळवितां आलें नाहीं.

पाश्चात्य संस्कृति - ग्रीक आणि रोमन संस्कृतीचा जगाच्या इतिहासांत मुख्य भाग हा कीं, यूरोपीय शास्त्रांचा पाया ग्रीकांनीं घातला. त्यांच्या कला, कल्पना ग्रीकांनीं विस्तृत केल्या, त्या उत्तरकालीन शिष्यांकडून जगभर पसरल्या. ग्रीक संस्कृतीचें अतिराष्ट्रीयत्व ग्रीसच्या राजकीय वर्चस्वाच्या दिवसांत होतें. तथापि ग्रीसच्या उचलीनें जगावर कायमचा परिणाम करून राष्ट्र मात्र नामशेष करून घेतलें.

रोमन साम्राज्य वाढलें, त्याचे तुकडे पडले, आणि तें नष्ट झालें. त्यानें जगास कायदेपद्धति उत्पन्न करून दिली.

ख्रिस्ती संप्रदायानें बर्‍याचशा जगास एकस्वरूप केलें; आणि आपण ख्रिस्ती असल्यामुळें दयावान् असलें पाहिजे ही भावना उत्पन्न करून दिली. या संप्रदयामुळें हिब्रू, ग्रीक व लॅटिन भाषांस महतत्व आलें.

मुसुलमानी संप्रदायाच्या स्थापनेमुळें आरबी भाषेस तेजस्विता आली व महत्त्वहि आलें; व अत्यंत मागसलेल्या लोकांची एकजूट करण्यास हा संप्रदाय कारण झाला; आणि वीस कोटी पेक्षां अधिक लोक यानें व्यापिले.

अर्वाचीन यूरोपांत जी वाढ झाली तिनें इतर सर्व वाढींचा संकोच करून आपलें प्रस्थ वाढविलें.

जगाचा इतिहास लिहावयाचा म्हणजे अधिक व्यापक क्रिया शोधावयाच्या; आणि त्यांस अधिक प्रामुख्य द्यावयाचें आणि कमी व्यापक क्रियांस कमी प्रामुख्य द्यावयाचें. तथापि क्रियांचें महत्त्व लक्षांत आणण्यासाठीं मूल स्थिति कशी काय होती तें आपणांस जाणलें पाहिजे. यासाठीं अत्यंत लहान राष्ट्रें जेव्हां जगांत होतीं त्या कालाकडे आपण प्रथम वळूं.