प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास
ब्राह्मण जातीचा इतिहास - हा इतिहास द्यावयाचा म्हटला म्हणजे हिंदुसंसकृतीचा संबंध इतिहास देणें होय.
दुसर्या भागांत यज्ञसंस्थचें वर्णन करतांना ब्राह्मण जातीचा कांहीं इतिहास आलाच आहे. तेथें (पृ. १९३-२२७ व पृ. ३५३-३८९) खालील विषयांचें विवेचन केलें आहे.
(१) यज्ञसंस्थेमध्यें यज्ञांत होणार्या क्रियांचें वैशिष्टयस्थापन आणि त्यामुळें ॠत्विजांचे झालेले त्रिविध भेद.
(२) त्रैविध ॠत्विजांची मूळचा अथर्व्यांशीं स्पर्धा.
(३) यज्ञसंकोच आणि ब्राह्मणांचें गृह्याकडे आणि सूतवाङ्मयाकडे व इतर व्यावहारिक धंद्यांकडे लक्ष.
ब्राह्मण जातीच्या प्रसारामुळें जेव्हां संस्कृति वर्धन पावली तेव्हां ब्राह्मणजाति आपली तत्कालीन विद्या घेऊन पसरली. तेव्हां ब्राह्मणांच्या विकासाचा इतिहास लिहावयाचा म्हणजे सर्व शास्त्रांच्या विकासाचा इतिहास दिला पाहिजे. कारण उच्च प्रकारची संस्कृति भारतीय व उपभारतीय लोकांस एकाच वर्गापासून मिळण्याजोगी होती व तिचें येथें अधिक विवेचन नकोच.