प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

इतिहासलेखनास वाङ्‌मयसाहित्याची मदत - इतिहासामध्यें जेव्हां आपण अवशेषांवरून ग्रंथरचना करावयास लागतों तेव्हां आपणांस विशेषेंकरून ग्रंथांकडेसच लक्ष द्यावें लागतें. कलेचा इतिहास, विचारांचा इतिहास इत्यादि साधनांपेक्षां विशेषतः वाङ्‌मयावरच जगद्विकायसूचक क्रिया व्यक्त करण्याची भिस्त असते. यासाठीं संस्कृतीच्या दृष्टीनें वाङ्‌मयाकडे पाहिलें पाहिजे.
वाङ्‌मयें सांप्रदायिक किंवा राष्ट्रीय स्वरूपांत प्रथम उत्पन्न होऊन तीं पुढें सांस्कृतिक स्वरूप पावतात. अशा तर्‍हेचीं वाङ्‌मयें येणेंप्रमाणें :

१ संस्कृत वाङ्‌मय - सांस्कृतिक.
२ पालीवाङ्‌मय - प्रथम सांप्रदायिक व नंतर सांस्कृतिक.
३ अरबी वाङ्‌मय - प्रथम राष्ट्रीय मग सांप्रदायिक आणि मग सांस्कृतिक.
४ चिनी वाङ्‌मय - प्रथम राष्ट्रीय व नंतर सांस्कृतिक.
५ फारसी वाङ्‌मय - प्रथम राष्ट्रीय मग सांस्कृतिक.
६ लॅटिन व ग्रीक - मुख्यतः राष्ट्रीय व राष्ट्र सर्वव्यापी बनल्यामुळें सांस्कृतिक. तसेंच सांप्रदायिकहि असल्यामुळें सांस्कृतिक.
७ इंग्रजी व स्पॅनिश - अनेक राष्ट्रव्यापी. विशिष्ट संस्कृतीचें बोधक नाहीं. या वाङ्‌मयांत एकत्व उत्पन्न होण्यापूर्वीच जगाची विचारैक्यता होणें शक्य असल्यामुळें यास सांस्कृतिक वैशिष्टय येईलच असें सांगतां येत नाहीं.

याखेरीज इतर वाङ्‌मयांस अतिसांप्रदायिक किंवा अतिराष्ट्रीय महत्त्व देतां येत नाहीं.
ब्राह्मण जातीच्या इतिहासाचा जगाच्या संस्कृतीशीं संबंध येणेंप्रमाणें सांगतां येईल.