प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

यूरोप व इतर जग यांचा संबंध - यूरोपच्या इतिहासाशीं जगाचा संबंध निश्चितपणें १५०० नंतरचा आहे; तथापि यूरोप व इतर जग यांचा मधून मधून संबंध आलाच आहे. त्या संबंधाचे प्रसंग येणें प्रमाणें :
(१) ख्रि. पू. ५०० नंतर इराणी लोकांनीं ग्रीसला शह दिला व इजिप्‍त जिंकला. पूर्व पश्चिम संयोगाचा तो एक महत्त्वाचा काल होय.
(२) बौद्ध संप्रदायाचा प्रसार त्रान्सकाकेशियापर्यंत प्रत्यक्ष आणि मणिसंप्रदायामार्फत रोमन साम्राज्यांत झाला आहे.
(३) अलेक्झांडरच्या दिग्विजयामुळें दोन्ही खंडांचा बराच निकट संबंध आला.
(४) रोमन साम्राज्य हें आपली सत्ता पूर्वेकडे वाढवून पूर्व पश्चिम येथील संस्कृतीचें संयोजक बनलें.
(५) सिथियन, हूण या लोकांनीं एशिया व यूरोप येथील संस्कृत राष्ट्रांत सारखाच उपद्रव दिला.
(६) मुसुलमानांनीं मोरोक्को व स्पेनपासून ब्रह्मदेश व फिलिपाईनपर्यंत आपला दरारा बसविला होता.
या गोष्टी लक्षांत घेतल्या असतां जगद्‌व्यापक चळवळी येणें प्रमाणें दिसतात :
(१) इराणचें सत्तावर्धन, (२) बौद्धसंप्रदायाचा प्रसार, (३) अलेक्झांडरची स्वारी, (४) रोमन साम्राज्य, (५) सिथियन व हूण यांचा इतिहास, (६) मुसुलमानी दिग्विजय.
या सहा चळवळींचा इतिहास तीनहि खंडांस सामान्य आहे. व या चळवळींचा इतिहास हा अधिक व्यापक इतिहास होय. तथापि त्यापूर्वी प्रत्येक भूभागाची काय अवस्था होती हेंहि आपण जाणलें पाहिजे. याकरितां आपण प्रथमतः इराणमार्फत झालेल्या पूर्वपश्चिम संबंधाकडे लक्ष द्यावें लागेल.
इराणचें सार्वराष्ट्रीय महत्त्व दोन कालांत दृष्टीस पडतें. त्यापैकीं पहिला काल म्हटला म्हणजे ख्रिस्तपूर्व होय. आणि दुसरा काल म्हटला म्हणजे मुसुलमानी दिग्विजयाचा होय. या काळांत इराणची नवसंस्कृति हिंदुस्थानांत शिरली. या दोहोंपैकीं पहिलाच काल सध्यां विचारार्थ घेतला आहे. मुसुलमानी दिग्विजयाचा इतिहास पुढें स्वतंत्रपणें दिला आहे. त्यामुळें इराणची नवसंस्कृति व तिचा प्रसार यांची माहिती प्रथम देणें अवश्य नाहीं. तथापि आपणांस तत्पूर्वी आखणी एका गोष्टीचा विचार केला पाहिजे.