प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १ लें.
चोविसशें वर्षांतील जगद्विकास

राष्ट्रकांपासून राष्ट्रें तयार होण्याची क्रिया - लहान राष्ट्रकें मोडून मोठीं राष्ट्रें अगर साम्राज्यें तयार होणें ही क्रिया लहान प्रमाणावर अनेक ठिकाणीं झाली आहे. या प्रत्येक क्रियेचें क्षेत्र अर्थात् आसपासचा प्रदेश एवढेंच असावयाचें, व त्यांची चळवळ अनेकखंडव्यापीहि असणार नाहीं.

तथापि ही क्रिया कांहीं कमी महत्त्वाची नाहीं. घाईघाईनें जीं मोठालीं साम्राज्यें स्थापन झालीं तीं पुढें मोडून गेलीं आणि अल्पकालीन साम्राज्यामुळें अनेक लहान राष्ट्रें एक होऊन प्रजेचा एकजीव होणें ही क्रिया झाली नाहीं. तेव्हां जगद्विकासाच्या इतिहासांत साम्राज्यकरणापेक्षां राष्ट्रीकरणाची क्रिया अधिक व चिरस्थायी महत्त्वाची आहे.

लहान राष्ट्रांच्या किंवा दुसर्‍या कोणत्याहि मानवी समुच्चयांच्या इतिहासांत दोन क्रिया महत्त्वाच्या आहेत. त्यांपैकीं (१) समुच्चयांच्या एकमेकांशीं संबंधाच्या निर्णायक आणि (२) समुच्चयांच्या अन्तर्गत रचनेच्या निर्णायक या एक प्रकारच्या क्रिया होत :

लहान समुच्चय नाहींसे होऊन मोठे समुच्चय बनणें ही क्रिया सर्व जगांत चालूच आहे. आणि तिचें पर्यवसान गेल्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रसंघांत झालें. दुसर्‍या प्रकारच्या क्रियांपैकीं ज्या क्रिया महत्त्वाचा इतिहासविषय होत त्या येणें प्रमाणें.

(१) संयुक्तसंस्थानपद्धतीचें राष्ट्र मोडून एकतंत्री संस्थान बनणें.
(२) संप्रदायसंस्थेमुळें झालेलें राष्ट्रांचें एकीकरण व नंतर संप्रदायसंस्थेच्या दुर्बलतेमुळें होणारें पृथक्करण.
(३) लोकसत्तेची वाढ आणि तीमुळें लोकांमध्यें एकत्व भावनेचा विकास.
(४) लोकसत्तेमध्यें भांडवलवाले व काम करणारे यांमधील स्पर्धा.
(५) एकसमुच्चयाखालीं आलेल्या लोकांची एकसंस्कृतिपरंपरेंत वाढ.

वरील गोष्टी महत्त्वाचा इतिहासविषय होत. वैज्ञानिक इतिहास हा मात्र स्वतंत्र इतिहास आहे. एका राष्ट्रापासून दुसरें राष्ट्र, एका व्यक्तीपासून दुसरी व्यक्ति ज्ञान उचलते व वाढवते. वैज्ञानिक इतिहास राष्ट्रेतिहासाच्या मर्यादा दुर्लक्षून लिहिला पाहिजे.

कलेच्या इतिहासाविषयीं मात्र असें म्हणतां येईल कीं, तिचा इतिहास राष्ट्र, भाषा, संप्रदाय, विचारपद्धति, भोंवतालचें साहित्य यांनीं नियमित व संकीर्ण झाला आहे.

आपणांस जें इतिहाससूत्र पहावयाचें त्याची दिशा वर दिलेल्या स्पष्टीकरणावरून स्पष्ट होईल; ती ही कीं, लहान राष्ट्रांचा काल, लहान राष्ट्रांपासून मोठ्या राष्ट्रांचा व प्रांतिक भाषांचा विकास, राष्ट्रांतील लढायांमुळें जगांतील राष्ट्रमर्यादानिर्णायक अंगें, बौद्धिक व ईश्वरकल्पनामूलक सांप्रदायिक चळवळी इत्यादिकांचीं कार्ये आपणांस जाणलीं पाहिजेत.