प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग
प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.
वाङ्मय.- ख्रि. पू. सहाव्या शतकांत हिंदुस्थानांत एका विशिष्ट प्रकारचेंच वाङ्मय होतें असें मागें दाखविलेंच आहे. ह्या वाङ्मयाचा विस्तार पाहिला म्हणजे, त्या काळांतील सामान्य लोक हीं भिक्षुकवर्गाच्या ताटाखालचीं मांजरें नव्हतीं तर इतर देशांतल्याप्रमाणेंच त्यांच्या मतांची वगैरे वाढ स्वतंत्रपणानें होत होती हें स्पष्ट होतें. ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे सामान्य लोकांनीं तत्त्वज्ञानाच्या बाबतींत एवढी मजल कशी मारली याचें आश्चर्य वाटणार नाहीं. सामान्य लोकांस पूर्वकल्पनापरंपरेचें ओझें नव्हतें त्यामुळें त्यांचे विचार स्वतंत्र होते. या वाङ्मयाचें पर्यालोचन केलें असतां त्या काळांतील हिंदुस्थानचा बराच इतिहास बनवितां येण्यासारखा असल्यामुळें त्यापैकीं महत्त्वाचें जें तिपिटक अथवा पालीधर्मशास्त्र त्याचा विस्तरतः परामर्श होऊं.