प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

भाषा आणि वाङ्‌मय.- या सर्व गोष्टींवरून अनेक त-हेचा बोध घेण्यासारखा आहे. भाषा आणि वाङ्‌मय यांच्या दृष्टीनें एक दोन मुद्दे जे महत्त्वाचे वाटतात, त्यांबद्दल येथें जरा जास्त विवेचन केल्यास तें अप्रासंगिक होणार नाहीं. परस्परांत दळणवळण होण्यास भाषावैचित्र्यामुळें कोणतीहि अडचण येत नव्हती. ही अडचण सामान्य व्यवहाराच्या बाबतींत नव्हती इतकेंच न्वहे, तर अत्यंत गहन अशा धार्मिक व तत्त्वज्ञानात्मक विवेचनांत सुद्धां ही भाषावैचित्र्याची अडचण भासली नाहीं. पश्चिमेस कुरुक्षेत्रापासून तो पूर्वेस मगधापर्यंत, उत्तरेच्या बाजूस श्रावस्ती व नेपाळच्या टेकड्यांतील कुशिनार गांवापर्यंत व दक्षिणेस उज्जयिनीपर्यंत एकच भाषा व ती संस्कृत असणें शक्य नाहीं. लौकिक संस्कृत तर अद्याप जन्मासहि आलें नव्हतें, व ब्राह्मणांत वापरली गेलेली भाषा सामान्य लोकांच्या आटोक्यांत येण्यासारखी नव्हती. तेव्हां सरकारी कामगार, व्यापारी, सरदार, वगैरे सुसंस्कृत वर्गांत प्रचलित असलेल्या भाषेंतच हे संचारी भिक्षू बोलत असले पाहिजेत असें मानणें प्राप्त आहे. ही या सर्व लोकांत वापरली जाणारी सामान्य भाषा कोसल देशाची जी वाढ झाली तिनें आणखीच जोरावली. बौद्ध संप्रदायाच्या उदयापूर्वीं कोसल देशांत आजच्या सर्व संयुक्त प्रांताचा समावेश होत असे. उपर्युक्त सर्वसामान्य भाषेमुळें या विस्तीर्ण प्रदेशाच्या या टोंकापासून त्या टोंकापर्यंत, सरकारी व व्यापारी सर्व त-हेचें दळणवळण सुरळीतपणें होणें सुलभ झालें. या राजकीय परिस्थितीमुळेंच संचारी भिक्षूंच्या संस्थांची किंवा मतांची भरभराट होत गेली. सदरहू संचारी भिक्षूंचा कोसल राज्याच्या स्थापनेपूर्वीं कोठें मागमूसहि नव्हता. या भिक्षूंनीं बौद्धिक उत्क्रान्ति करून सदरहू भाषेला बरीच प्रोढ बनविली.

संस्कृत नाटकांच्या वाचनानें मनावर जो परिणाम होतो त्यामुळें हा भाषेचा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे. संस्कृत नाटकांत कोणत्याहि दर्जाचीं माणसें असली तरी त्यांनां संस्कृत भाषा समजते; व स्त्रियांनां-विशेषतः उच्च दर्जाच्या स्त्रियांनां-संस्कृत भाषा समजते इतकेंच नव्हे तर प्रसंगीं त्या संस्कृत बोलतातहि असें समजलें जाते.

संस्कृत नाटकें लिहिलीं गेलीं त्या काळांत कोणती भाषा प्रचलित होती याविषयीं नक्की विधान संस्कृत नाटकांवरून करतां येत नाहीं. शिष्ट लोकांची भाषा संस्कृत म्हणून ग्रंथकारांनीं कदाचित् नाटकांची भाषा प्रामुख्यानें संस्कृत केली असेल. तें कसेंहि असलें, व संस्कृत ही जरी त्या काळांत बोलण्याची भाषा होती असें मानिलें, तरी या गोष्टीला बाराशें वर्षांपूर्वींच्या स्थितीचा निदर्शक पुरावा म्हणून मानतां येणार नाहीं.