प्रस्तावनाखंड : विभाग चवथा - बुद्धोत्तर जग

प्रकरण १० वें.
बुद्धापासून चंद्रगुप्तापर्यंतच्या काळची सामाजिक परिस्थिति.

ब्राह्मणांस वर्चस्व राखण्यासाठीं द्यावी लागलेली किंमत.- ब्राह्मणधर्मानें हा विजय संपादन केला खरा, पण याला विजय कसा म्हणतां येईल ? समाजसंस्था व धर्मशास्त्राच्या बाबी यांत ब्राह्मणांनीं सर्व मक्ता आपल्या कडे घेतला; जातिभेदाची पद्धति सर्व चालू होती तरी ब्राह्मण जातीचें वर्चस्व निमूटपणें मान्य झालें, व अध्यापनाचा अधिकार ब्राह्मणांनांच आहे त्याबद्दलहि वाद राहिला नाहीं. ब्राह्मणांच्या वर्चस्वाचा ज्यांनां हेवा वाटे व जे त्यांच्याशीं भांडत त्या रजपुतांतील बौद्ध व जैन लोकांची संख्या बरीच कमी होऊन हे पक्ष पडल्यासारखे झाले होते, व बाकीचे सर्व त्यांच्या आधीन झाले होते. सर्वांभूतीं परमेश्वराचें अस्तित्व पाहणा-या पंथाखेरीज इतर पंथांचें तत्त्वज्ञान कुचकामाचें ठरलें गेलें. हें सर्व झालें खरे, पण याबरोबरच वैदिक देवता, वैदिक भाषा, वैदिक तत्त्वज्ञान हींहि या झपाट्यांत चुरडलीं गेलीं. लोक आपआपल्या देवतांनां मान देऊं लागले. हिंसाप्रधान यज्ञ अद्यापहि क्वचित् होत असत, परंतु ते आतां नवीन देवतांनां उद्देशून होऊं लागले. याज्ञिक कर्मांत ब्राह्मणांचे वर्चस्व होतें तें कमी कमी होत चाललें. वैदिक देवतांनां न मानणा-या व त्यांची पूजा न करणा-या लोकांची मनधरणी करण्यासाठीं नवीन दैवतकल्पनांनां अनुसरून ब्राह्मणांनां आपलें वाङ्‌मय फिरवावें लागलें. जुन्या गोष्टींस नव्या कल्पनांनां पटेल असलें काव्यमय स्वरूप देण्याच्या भरांत ऐतिहासिक दृष्टि नष्ट झाली. ब्राह्मणांनीं यज्ञकर्माचें नेतृत्व टाकून देऊन लोकांच्या कल्पनांनां काव्यमय रूप देण्याचें पतकरलें. त्यांच्या देवांचे जेव्हां त्यांनीं पोवाडे गाण्यास सुरुवात केली, तेव्हांच त्यांनां आपलें वर्चस्व राखतां आलें. त्यांच्यापैकीं पुष्कळ लोकांची गरज भागली खरी, पण पुष्कळ लोक वैदिक देवतांनां मानीनातसे झाले. त्यांच्यामधील फारच थोड्या लोकांनीं वैदिक सरस्वतीचा ओघ थोडासा कायम ठेविला होता.